
आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम 2 संघ ठरले आहेत. टीम इंडियाने सुपर 4 मधील सलग 2 सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध 25 सप्टेंबरला सुपर 4 फेरीतील पाचव्या सामन्यात 135 धावांचा यशस्वी बचाव केला. पाकिस्तानने बांगलादेशवर 11 धावांनी मात केली. यासह पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक दिली. आता उभयसंघात 28 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. त्याआधी सुपर 4 फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा शुक्रवारी 26 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाकडे हा सामना जिंकून विजयी षटकार लगावण्याची संधी आहे. तसेच श्रीलंकेचं या स्पर्धेतून पॅकअप झालंय. त्यामुळे श्रीलंकेचा हा सामना जिंकून या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. एकूणच दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. टीम इंडिया 2 बदल करु शकते.
टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर केलं जाऊ शकतं. शिवमला बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. शिवमने त्या सामन्यात अवघ्या 2 धावा केल्या होत्या. त्यामुळे शिवमच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये फिनिशर रिंकु सिंह याला संधी दिली जाऊ शकते. रिंकूला या स्पर्धेत एकाही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे रिंकू या प्रतिक्षेच्या संधीत आहे.
तसेच टीम मॅनेजमेंट बॉलिंगमध्येही 1 बदल करु शकते. वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला महाअंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे बुमराहच्या जागी अर्शदीप सिंह याचा समावेश केला जाऊ शकतो. आता टीम मॅनेजमेंट 2 बदल करणार की आहे त्याच प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.