
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी आतापर्यंत एकूण 8 पैकी 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. यंदा आशिया कपचा 17 वा हंगाम आहे. या हंगामाला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. पाकिस्तान, भारत, हाँगकाँग, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने संघ जाहीर केला आहे. तर यूएई, श्रीलंका आणि ओमानने संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघ या स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. सूर्यासाठी टी 20i कॅप्टन म्हणून आतापर्यंतची ही सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे सूर्याचा क्रिकेट चाहत्यांना कायम लक्षात राहिली अशी कामगिरी करुन दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमान विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला अविस्मरणीय कामगिरी करण्याची संधी आहे. अर्शदीपने आतापर्यंत भारतासाठी टी 20i सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे अर्शदीप आशिया कप स्पर्धेत विशेष असं करुन दाखवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
या स्पर्धेत अर्शदीप व्यतिरिक्त अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान याला वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. राशीदला सर्वाधिक टी 20i विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. राशीदला त्यासाठी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. राशीद हा वर्ल्ड रेकॉर्ड आशिया कपआधी होणाऱ्या टी 20 ट्राय सीरिजमध्येही करु शकतो. मात्र राशीद आशिया कप निमित्ताने वर्ल्ड रेकॉर्डसाठी अधिकची संधी आहे. टी 20 ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान सहभागी होणार आहेत. या मालिकेत प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळणार आहे.
टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 164 विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा न्यूझीलंडच्या टीम साऊथी याच्या नावावर आहे. तर राशीदच्या खात्यात 161 विकेट्स आहेत. त्यामुळे राशीदला फक्त 4 विकेट्सची गरज आहे.
राशिद खान याच्याकडे टी 20 आशिया कप स्पर्धेत भुवनेश्वर कुमार याच्या नावावर असलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भुवीने टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या होत्या. तर राशीद या विक्रमपासून फक्त 3 विकेट्सने दूर आहे. राशीदने टी 20 आशिया कपमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे राशिद भुवनेश्वरलाही पछाडणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अर्शदीपला आशिया कप स्पर्धेत विकेट्सचं शतक पूर्ण करण्याची संधी आहे. अर्शदीपने आतापर्यंत टी 20i कारकीर्दीत 99 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे अर्शदीपला खास शतकासाठी 1 विकेटची गरज आहे.