AFG vs HK : अफगाणिस्तानकडून 140 धावांचा यशस्वी बचाव, हाँगकाँगवर 24 रन्सने विजय, सेमी फायनलची आशा कायम

Afghanistan A vs Hong Kong Match Result : अफगाणिस्तान ए क्रिकेट टीमने हाँगकाँगवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला. अफगाणिस्तानने या विजयासह उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखलं.

AFG vs HK : अफगाणिस्तानकडून 140 धावांचा यशस्वी बचाव, हाँगकाँगवर 24 रन्सने विजय, सेमी फायनलची आशा कायम
Afghanistan A
Image Credit source: @ACBofficials X Account
| Updated on: Nov 19, 2025 | 10:38 PM

अफगाणिस्तान ए क्रिकेट टीमने एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत साखळी फेरीतील आपल्या तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. अफगाणिस्तानने हाँगकाँगवर मात करत साखळी फेरीतील दुसरा विजय मिळवला. अफगाणिस्तानने यासह उपांत्य फेरीची आशा कायम ठेवली. अफगाणिस्तानने दमदार गोलंदाजीच्या जोरावर 150 पेक्षा कमी धावांचा यशस्वी बचाव केला. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयाची आशा आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग सामन्यात काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात. अफगाणिस्तानने हाँगकागंसमोर 141 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अफगाणिस्ताच्या गोलंदाजांसमोर हाँगकाँगला 20 ओव्हर खेळूनही विजयी धावांपर्यंत पोहचता आलं नाही. अफगाणिस्तानने हाँगकाँगला 20 ओव्हरमध्ये 116 रन्सवर 9 झटके दिले. अफगाणिस्तानने अशाप्रकारे हा सामना 24 धावांनी जिंकला. तर हाँगकाँगला या मोहिमेत एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही.

हाँगकाँगने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अफगाणिस्तानला या संधीचा काही खास फायदा घेता आला नाही. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 140 रन्स केल्या. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद इशाक याने सर्वाधिक धावा केल्या. इशाकने 29 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. इम्रान मीर याने 20 आणि रहमानुल्लाह याने 24 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी फरमानुल्लाह सफी याने नाबाद 23 धावा केल्या. हाँगकाँगकडून हस्सान खान याने 3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद वहीद याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

हाँगकाँगची बॅटिंग

हाँगकाँगच्या पहिल्या 4 फलंदाजांना विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र एकालाही हाँगकाँगसाठी मोठी खेळी करुन विजयी करता आलं नाही. अनुभवी बाबर हयात याने सर्वाधिक 30 धावा केल्या. अंशुमन रथ याने 27 धावांचं योगदान दिलं. शीव माथुर याने 24 धावा केल्या. तर झीशान अली आणि एझाज खान या दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा केल्या. हाँगकाँगला अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 116 धावांपर्यंतच पोहचता आलं.

हाँगकाँगचा सलग तिसरा पराभव

दरम्यान हाँगकाँग क्रिकेट टीमचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग तिसरा पराभव ठरला. हाँगकाँगला अफगाणिस्तानआधी बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभूत व्हावं लागलं. बांगलादेशने हाँगकाँगचा 15 नोव्हेंबरला 8 विकेट्सने धुव्वा उडवला. तर त्यानंतर श्रीलंकेने 17 नोव्हेंबरला हाँगकाँगला पराभवाची धुळ चारली. श्रीलंकेने हाँगकाँगवर 7 विकेट्सने विजय मिळवला.