
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला आता अवघे काही तास बाकी आहेत. स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं 2017 नंतर पहिल्यांदा आयोजन करण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. मात्र त्याआधी अनेक संघांमागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.या दुखापतीने अनेक खेळाडूंना आपल्यात जाळ्यात अडकवलं आहे. दुखापतीमुळे या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
आतापर्यंत एकूण 11 खेळाडू हे या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत. या 11 पैकी 9 खेळाडूंना दुखापत झाल्याने या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तर 2 खेळाडूंचं कारण वेगळं आहे. एकाने वैयक्तिक कारण देत या स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलंय. तर दुसऱ्याने संघात निवड होऊनही एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हे एकूण 11 खेळाडू कोण आहेत? त्यापैकी सर्वाधिक कोणत्या संघाचे आहेत? हे जाणून घेऊयात.
चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलेल्या एकूण 11 पैकी 5 खेळाडू हे एकट्या ऑस्ट्रेलियाचे आहेत. कर्णधार पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि ऑलराउंडर मिचेल मार्श या तिघांना दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. तर मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर मिचेल स्टार्क याने अखेरच्या क्षणी वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
दक्षिण आफ्रिकेच्या 2 गोलंदाजांना दुखापतीमुळ स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. गेराल्ड कोएत्झी आणि एनरिच नॉर्खिया हे दोघे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. बुमराहचं बाहेर होणं भारतासाठी मोठा झटका आहे. बुमराहच्या जागी हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे.
अफगाणिस्तानचा 18 वर्षीय युवा ऑफ स्पिनर अल्लाह गजनफर याला फ्रॅक्चरमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आयपीएल 2025 मधून बाहेर व्हावं लागलं आहे. अल्लाहला दुखापतीमुळे 4 महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यामुळे राखीव म्हणून संधी मिळालेल्या नांग्याल खरोटी याचा अल्लाहच्या जागी मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडचा बॅटिंग ऑलरउंडर जेकब बेथेल याला हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर व्हावं लागलं आहे. जेकबला इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ही दुखापत झाली होती. आता जेकबच्या जागी टॉम बँटन याचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा युवा सलामीवीर सॅम अय्युब यालाही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 5, दक्षिण आफ्रिकेचे 2 तर टीम इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या 4 संघांचे प्रत्येकी 1-1 खेळाडू या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.