Womens World Cup: ऑस्ट्रेलियाच्या गार्डनर-सदरलँडचा इंग्लंडला दणका, 6 विकेट राखून केलं पराभूत

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 23वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 6 गडी आणि 57 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप मारली आहे.

Womens World Cup: ऑस्ट्रेलियाच्या गार्डनर-सदरलँडचा इंग्लंडला दणका, 6 विकेट राखून केलं पराभूत
Womens World Cup: ऑस्ट्रेलियाच्या गार्डनर-सदरलँडचा भागीदारीचा इंग्लंडला दणका, 6 विकेट राखून केलं पराभूत
Image Credit source: Icc X account
| Updated on: Oct 22, 2025 | 9:45 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. तसं या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पण उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 244 धावा केल्या आणि विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही चांगली झाली नाही. 68 धावा असताना 4 गडी तंबूत गेले होते. त्यामुळे हा सामना इंग्लंड सहजासहजी देणार नाही असं वाटत होतं. पण पाचव्या विकेटसाठी एनाबेल सदरलँड आणि एशले गार्डनर यांनी विजयी भागीदारी केली. या दोघांची जोडी काही इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडता आली नाही. या दोघांनी मिळून 148 चेंडूत 180 धावा काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंड महिला संघाविरुद्ध विश्वचषकात यशस्वीरित्या पाठलाग केलेले हे सर्वोच्च लक्ष्य ठरलं आहे. या आधी 2013 मध्ये ब्रेबॉर्न येथे श्रीलंकेने 239 धावांचा पाठलाग केला होता.

एनाबेल सदरलँडने 112 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारून नाबाद 98 धावांची खेळी केली. विजयी धावा पूर्ण झाल्याने तिचं शतक अवघ्या दोन धावांनी हुकलं. खरं तर चौकार किंवा षटकार मारून शतक करण्याची संधी होती. पण या संधीचं काही सोनं करता आलं नाही. सदरलँडने गार्डनरला शेवटपर्यंत खेळण्यास सांगितले आणि तिच्या 100 धावांची काळजी करू नका असा स्पष्ट मेसेज दिला. एशले गार्डनरने विजयी चौकार मारला आणि संघाला विजय मिळून दिला. एशले गार्डनरने 73 चेंडूत 142.47 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 104 धावांची खेळी केली. यात त्याने 16 चौकार मारले. गार्डनर आणि सदरलँडच्या या भागीदारीमुळे या सामन्याचं चित्रच बदलले. विश्वचषक इतिहासातील सर्वोत्तम भागीदारींपैकी एक ठरली.

गार्डनर आणि सदरलँड यांच्यातील नाबाद 180 धावांची भागीदारी ही वनडे सामन्यांमध्ये पाचव्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी धावांसाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे. 2000 सालच्या विश्वचषकात लिंकन येथे श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या जेन स्मिट आणि क्लेअर टेलर यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 188 धावांची भागीदारी केली होती.या सामन्यात सर्वात्तम खेळीमुळे एनाबेल सदरलँड सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तिचं शतक हुकलं असलं तरी तिने गोलंदाजीतही योगदान दिलं होतं. त्यामुळे तिचा सन्मान करण्यात आला. एनाबेल सदरलँडने 10 षटकात 60 धावा दिल्या. यात 1 षटक निर्धाव टाकलं आणि तीन विकेट काढल्या. दुसरीकडे, एशले गार्डनरे 9 षटकात 39 धावा देत 2 गडी बाद केले होते.