
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी 30 सप्टेंबरला श्रीलंकेवर मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने 270 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 211 वर रोखलं. यासह टीम इंडियाने गुवाहाटीत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 59 धावांनी मात केली. त्यानंतर आता या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. एलिसा हीली हीच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व आहे. तर सोफी डिव्हाईन किवींच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना बुधवारी 1 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस विजेता ठरेल.
ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड वूमन्स मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह पाहता येईल.
न्यूझीलंडसमोर या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान असणार आहे. तसेच न्यूझीलंड कांगारुं विरुद्ध 8 वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. न्यूझीलंडला वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2017 पासून एकदाही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड बुधवारी 8 वर्षांनंतर पहिल्यांदा कांगारुंवर मात करत वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी देणार की ऑस्ट्रेलिया सलग 16 व्यांदा किंवीवर मात करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाने 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान भारतात आयोजित 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला ब्रिगेडचा विश्वास दुणावलेला आहे. अशात कांगारु या मोहिमेची सुरुवात कशी करतात? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.