AUSW vs ENGW : टी20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी, इंग्लंडचा 57 धावांनी उडवला धुव्वा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटमधील द्वंद्व सर्वश्रूत आहे. क्रिकेटच्या मैदानाला या सामन्यात युद्धाचं स्वरुप येतं. त्यामुळे या मालिकांकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. एशेज टी20 मालिकेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड आमनेसामने आले आहेत. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ वरचढ ठरला आहे.

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सामन्याचा निकाल पाहता फसला असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 198 धावा केल्या आणि विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं. सलामीला आलेल्या बेथ मूनीने आक्रमक खेळी केली. 51 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. तिची खेळी ऑस्ट्रेलियासाठी तारक ठरली असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 199 धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघाची सुरुवात एकदम खराब झाली. पहिल्या दोन षटकातच आघाडीचे दोन फलंदाज खातं न खोलता बाद झाले. त्यामुळे इंग्लंडवर दडपण वाढलं होतं. सोफिया डंकलेने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. तिने 30 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. पण इतर खेळाडूंकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ फक्त 16 षटकात 141 धावा करून सर्वबाद झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 57 धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट हीने सांगितलं की, ‘मूनीची खेळी उत्कृष्ट होती. ती क्रिझमध्ये अशी वावरत होती की, त्यामुळे गोलंदाजांना त्रास झाला. आम्ही 25-30 धावा अतिरिक्त दिल्या. आम्ही अन्यथा खेळात असतो. सोफिया फलंदाजी करत असताना आम्ही त्यात आहोत असे वाटले. ती उत्कृष्ट होती, खूप मुक्तपणे खेळली. तिचा खेळ दुसऱ्या बाजूला उभं राहून पाहणं खरंच आनंद घेण्यासारखं होतं. चुकीचा फटका खेळला आणि बाद झाली. तसं व्हायला नको होतं.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): माईया बाउचियर, डॅनिएल व्याट-हॉज, सोफिया डंकले, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): जॉर्जिया वॉल, बेथ मूनी (विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲनाबेल सदरलँड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वेरेहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शूट.