
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्ताननंतर आणखी एका आशियाई संघाला पराभूत व्हावं लागलं आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 6 विकेट्सने मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी मिळालेलं 229 धावांचं माफक आव्हान हे 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. शुबमन गिल याचं नाबाद शतक आणि केएल राहुलची निर्णायक खेळीमुळे भारताला सहज विजयी होता आलं. शुबमन आणि केएल या दोघांनी नाबाद खेळी केली. शुबमनने 101 तर केएलने 41 धावांचं योगदान दिलं. बांगलादेशचा पराभव कर्णधार नजमुल हुसैन शांतोला चांगलाच जिव्हारी लागला. नजमूलने पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाचा उल्लेख केला. नजमूल काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया बॅटिंगसाठी आली तेव्हा आम्ही सुरुवातीला विकेट्स घेतल्या असत्या तर निकाल वेगळा असता, ज्यामुळे सामन्यात फरक पडला असता, असं नजमूलने म्हटलं. नजमूलच्या या प्रतिक्रियेवरुन शुबमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी केलेली 69 धावांची सलामी भागीदारी ही पराभवासाठी कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतंय. नजमुलनुसार जर बांगलादेशच्या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या असत्या तर सामना बदलला असता.
“आम्ही ज्या पद्धतीने पावर प्लेमध्ये बॅटिंग केली, त्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. पुढे बॅटिंगसाठी येणाऱ्या फलंदाजांना या अशा प्रतिकूल स्थितीतून बाहेर येणं अवघड होतं. तॉहिद हृदॉय आणि जाकीर या दोघांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते अप्रतिम होतं”, असंही नजमूलने स्पष्ट केलं.
दरम्यान शुबमन गिल याने 129 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 101 रन्स केल्या. शुबमनचं हे एकदिवसीय कारकीर्दीतील आठवं शतक ठरलं. शुबमनला या शतकी खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.