
शाहीन शाह आफ्रिदी याच्या नेतृत्वात पाकिस्तानने शुक्रवारी 13 मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध मोठा विजय मिळवला. पाकिस्तानने बांगलादेशचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने धुव्वा उडवला. पाकिस्तानने या विजयासह 2 कामं केली. पाकिस्तानने हा सामना जिंकून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तसेच पाकिस्ताने पहिल्या पराभवाची परतफेड केली. पाकिस्ताने या विजयासह मालिकेतील आव्हान कायम राखलं. त्यामुळे आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. अशात आता कोणता संघ सामना आणि मालिका जिंकण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बांगलादेशने मालिकेत विजयी सलामी दिली. बांगलादेशने पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर पाकिस्ताने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 128 धावांच्या (DLS) मोठ्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्ताने करो या मरो सामन्यात विजय मिळवून मालिकेत यशस्वीरित्या 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक झाला आहे. दोन्ही संघांचा मालिकेवर डोळा आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उभयसंघात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ एकूण 41 वेळा आमनेसामने आले आहेत. या 41 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये पाकिस्तानचा बोलबाला असल्याचं आकड्यांवरुन सिद्ध होतं. पाकिस्तानने बांगलादेशवर 41 पैकी 35 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेशने पाकिस्तानला 6 वेळाच वनडे क्रिकेटमध्ये पराभूत केलंय.
दरम्यान उभयसंघातील गेल्या 5 सामन्यांमध्ये पाकिस्तानच वरचढ आहे. पाकिस्तानने गेल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला एकमेव सामना जिंकण्यात यश आलं आहे.
शाहीन शाह अफ्रिदी याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर मेहदी हसन मिराजकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची सूत्र असणार आहेत. पाकिस्तान बांगलादेशच्या तुलनेत सरस आणि अनुभवी आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना आणि मालिका जिंकणं प्रतिष्ठेचा विषय आहे. तर बांगलादेश यजमान आहे. त्यामुळे बांगलादेशसमोर पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. अशात आता कोण सामना आणि मालिका आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल.