IPL 2026 दरम्यान रंगणार 2 मालिकांचा थरार, 6 सामन्यांच्या वेळेत अचानक बदल, कारण काय?
Cricket Match Time : विजेची बचत करण्यासाठी क्रिकेट बोर्डाने मालिकांच्या सामन्यात वेळेत बदल केला आहे. त्यामुळे सुधारित वेळेनुसार आता डे-नाईटऐवजी सकाळी सामन्यांना सुरुवात होणार आहे.

भारतात सध्या 10 संघांमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा (IPL 2026) थरार सुरु आहे. आयपीएल स्पर्धेत अपवाद वगळता अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतात. आयपीएल स्पर्धेदरम्यान क्वचितच द्विपक्षीय मालिकेचं आयोजन केलं जातं. बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु असताना द्विपक्षीय मालिकेचं आयोजन केलं आहे. यजमान बांगलादेश न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20I मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. बीसीबीने मायदेशात होणाऱ्या या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक आधीच जाहीर केलं आहे. मात्र आता या मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीबीने सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे
न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा
न्यूझीलंड क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 असे एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने 17 एप्रिलपासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका वुमन्स टीम बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे.
वीज बचतीसाठी बीसीबीचा मोठा निर्णय
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातही एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुरुष आणि महिला संघांच्या या मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. विजेची बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
ढाका आणि चट्टोग्राममध्ये एकदिवसीय मालिकेतील सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. नियोजित वेळापत्रकानुसार महिला संघांमध्ये होणारे हे सामने डे नाईट असे होणार होते. मात्र आता सामन्यांची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता या सामन्यांना सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर सूर्यास्ताआधी सामना संपवण्याचा क्रिकेट बोर्डाचा प्रयत्न असणार आहे. अंदाजे सामन्याची स्थानिक वेळेनुसार साडे सहा वाजता सांगता होईल. दिवसा सामने आयोजित केल्याने विजेची बचत होईल, अशी आशा बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आहे.
तसेच मेन्स टीमच्या टी 20i सीरिजमधील सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तसेच सामना संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत संपवण्याचा बीसीबीचा प्रयत्न असणार आहे. वुमन्स टीमच्या टी 20i सीरिजमध्ये एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वेळापत्रकानुसार हे 3 सामने 28-30 एप्रिल आणि 2 मे रोजी होणार आहेत. या सामन्यांना संध्याकाळी साडे सहाऐवजी दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील सामनेही दिवसा होणार आहेत.
दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल. मात्र क्रिकेट चाहत्यांना भर उन्हात स्टेडियममध्ये बसून हे सामने पाहावे लागतील.