
टी20 वर्ल्डकप स्पर्धा पुढच्या महिन्यात 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.बीसीसीआयने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टोकाचा वाद झाल्याचं दिसत आहे. बांगलादेशने भारतात टी20 वर्ल्डकप खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर प्रकरण सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आयसीसी या दोन्ही बोर्डांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या दरम्यान बांगलादेशी मीडियानुसार, सुरक्षेचं कारण देत बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतात येण्यास मनाई केली आहे. बांगलादेशने स्टेट लेव्हल सिक्युरिटी देऊनही भारतात खेळण्यास नकार दिला आहे.
बांगलादेशी मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने या प्रकरणी मंगळवारी 6 जानेवारी रोजी बांग्लादेश क्रिकेट बोर्डासोबत ऑनलाइन बैठक घेतली. यात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. रिपोर्टनुसार, बांग्लादेश बोर्डाच्या सुरक्षेची चिंता दूर करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तयार आहे. बांगलादेशी संघाला स्टेट लेव्हल सिक्युरिटी देण्याची तयारी दाखवली आहे. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. इतकंच काय तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता आयसीसीपुढे पेच निर्माण झाला आहे. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागणार असं दिसत आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची आडमुठी भूमिका पाहता पाकिस्तानसारखेच वागत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. भारताने मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. तेव्हा भारताचे सामने युएईत झाले होते. त्यानंतर पाकिस्तानने संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत सामने खेळला होता. तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. बांगलादेशमधील राजकीय स्थिती बदलल्यानंतर सर्वच पातळीवर भारताशी संबंध तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतकंच काय तर तिथे हिंसाचाराच्या घटनेतही वाढ होत आहे.