
बीसीसीआयच्या आदेशानंतर किंग खान शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायजीने त्यांच्या ताफ्यातील बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला मुक्त केलं. बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय आणि राजकीय परिस्थिती पाहता भारतात संतापाची लाट उसळली. त्यामुळे पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशच्या खेळाडूंनाही आयपीएल स्पर्धेत खेळवू नये, अशी तीव्र भावना भारतीयांची होती. बीसीसीआयने जनमत पाहता मुस्तफिजुरला टीममधून बाहेर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केकेआरने 3 जानेवारीला मुस्तफिजुरला बाहेरचा रस्ता दाखवला. केकेआरने मुस्तफिजुरला 19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं होतं. केकेआरने मुस्तफिजुरसाठी 9 कोटी 20 लाख रुपये मोजले होते.
मुस्तफिजुर या कारवाईनंतर मानसिकरित्या खचल्याचं समोर आलं आहे. मुस्तफिजूर सध्या बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळतोय. या स्पर्धेतील सहकारी खेळाडूने मुस्तफिजूरबाबत ही माहिती दिलीय.
मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) स्पर्धेत रंगपूर रायडर्ससाठी खेळतोय. केकेआरने रिलीज केल्यानंतर मुस्तफिजूरने दुसऱ्याच दिवशी चमकदार कामगिरी केली. मुस्तफिजूरने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सहकारी खेळाडू नुरुल हसन याने मुस्तफिजूरबाबत काय माहिती दिली हे जाणून घेऊयात.
नुरुल हसन बीपीएल स्पर्धेत रंगपूर रायडर्सचं नेतृत्व करत आहे. “मुस्तफिजूर टीमसाठी जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, हे त्याने वारंवार सिद्ध केलं आहे. सर्वांना रहमानवर विश्वास आहे. रहमानला काही सिद्ध करण्याची गरज नाही, असं नुरुलने म्हटलं.
मुस्तफिजूर आता शांत आहे. मात्र केकेआरमधून रिलीज झाल्यानंतर त्याला निराशा होऊ शकते. मुस्तफिजुरकडे सध्या जे काही आहे त्यासाठी तो लायक आहे. त्याने बांगलादेशसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही नुरुलने सांगितलं. तसेच केकेआरच्या कारवाईनंतर मुस्तफिजूर मानसिकरित्या खचला होता, असंही नुरूलने स्पष्ट केलं.
दरम्यान मुस्तफिजूर याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 संघांसाठी 60 सामने खेळले आहेत. मुस्तफिजूरने जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या या टी 20 स्पर्धेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिट्ल्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 6 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुस्तफिजूरने या 60 सामन्यांमध्ये एकूण 65 विकेट्स घेतल्या आहेत.