
पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम बऱ्याच कारणांमुळे बिग बॅश लीग स्पर्धेत चर्चेत आला. सिडनी सिक्सर्स फ्रेंचायझीने त्याच्यावर डाव लावला. पण हा डाव महागडा ठरला असंच म्हणावं लागेल. सर्वात महागडा परदेशी खेळाडू म्हणून त्याच्यावर बोली लागली होती. पण संपूर्ण पर्वात त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. एक एक धाव घेताना त्याचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे मार्क वॉने त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला होता. कारण प्लेऑफच्या दुसऱ्या सामन्यात सिडनी सिक्सर्स आणि होबार्ड हरिकन्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीची तिकीट मिळणार आहे. असं असताना सिडनी सिक्सर्ससाठी बाबर आझम डोकेदुखी ठरला होता. त्यामुळे त्याला बसवायची तयारी सुरू होती. पण सुंटीवाचून खोकला गेला असंच म्हणावं लागेल. त्याची प्रत्येक धाव सिडनी सिक्सर्सा लाखो रुपयात पडली.
मिडिया रिपोर्टनुसार, बाबर आझमला बिग बॅश लीग स्पर्धेत 2.35 कोटी रूपये मिळाले होते. त्याला प्लॅटिनम करार मिळाला होता. बिग बॅश लीग स्पर्धेच्या इतिहासातील विदेशी खेळाडूला दिलेलं सर्वात मोठं पॅकेज होतं. पण असं असूनही बाबर आझमने काही खास केलं नाही. त्याची कामगिरी पाहून त्याला इतके पैसे का दिले असं फ्रेंचायझी डोक्यावर हात मारून बोलत असेल. बाबर आझमने सिडनी सिक्सर्ससाठी 11 सामने खेळले आणि 202 धावा केल्या. त्याची सरासरी जवळपास 22.44 ची होती आणि स्ट्राईक रेटही 103.06 चा होता. त्याने दोन अर्धशतकं ठोकली. पण संथ गतीने धावा काढल्या.
बाबर आझमने या स्पर्धेत केलेल्या धावा आणि मिळालेल्या पैशांचं गणित सोडवलं तर चित्र स्पष्ट होते. बाबर आझमला प्रत्येक धावेसाठी 1.26 ते 1.27 लाख रूपये मिळाले. दुसरीकडे, बाबर आझम आणि वाद हे चित्र पाहायला मिळालं ते वेगळं.. त्याच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. स्टीव्ह स्मिथने तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने राग व्यक्त केला होता. आता पाकिस्तानच्या गोटात सहभागी झाला असून टी20 वर्ल्डकप संघात निवड होते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.