
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याचा अखेर आयपीएलच्या 19 मोसमातून (IPL 2026) पत्ता कट करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमने मुस्तफिजूरला मिनी ऑक्शनमधून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र वाढत्या विरोधानंतर आणि बीसीसीआयच्या आदेशानंतर अखेर मुस्तफिजूर याची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुस्तफिजूर रहमानवरुन वाद असतानाच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीबीने आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.
बीसीबीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात एकूण 15 खेळाडूंना संधी दिली आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बीसीबीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात मुस्तफिजूर रहमान यालाही संधी दिली आहे. बांगलादेश वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला खेळणार आहे.
बांगलादेशने आतापर्यंत झालेल्या 9 टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र बांगलादेशला अद्याप एकदाही उपांत्य फेरीतही पोहचता आलेलं नाही. यंदा भारत आणि श्रीलंका इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे बांगलादेश या संधीचा फायदा घेत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान आयसीसीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. बांगलादेशचा सी ग्रपुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीसह नेपाळ, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. बांगलादेशने आतापर्यंत अनेक संघांना पराभूत केलंय. सी ग्रुपमध्ये नेपाळ आणि इटली हे संघ तुलनेत नवखे आहेत. मात्र बांगलादेशसमोर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचं आव्हान असणार आहे.
विरुद्ध वेस्ट इंडिज, 7 फेब्रुवारी, कोलकाता
विरुद्ध इटली, 9 फेब्रुवारी, कोलकाता
विरुद्ध इंग्लंड, 14 फेब्रुवारी, कोलकाता
विरुद्ध नेपाळ, 17 फेब्रुवारी, मुंबई
वर्ल्ड कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा
The Bangladesh Cricket Board (BCB) has announced the national squad for the ICC Men’s T20 World Cup 2026, to be jointly hosted by India and Sri Lanka from 7 February to 8 March.
SQUAD
Litton Kumer Das (Captain), Mohammed Saif Hassan (Vice Captain), Tanzid Hasan, Mohammad Parvez… pic.twitter.com/A9o7EtB99v— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 4, 2026
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी बांगलादेश टीम : लिट्टन दास (कर्णधार), तंझीद हसन, परवेज होसैन, सैफ हसन, तॉहीद हृदॉय, शमीम होसैन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद होसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शैफुद्दीन आणि शोरीफुल इस्लाम.