
क्रिकेट चाहत्यांना आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं आहे. भारत आणि श्रीलंकेतील एकूण 7 शहरांमधील 8 स्टेडियममध्ये 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या 10 व्या टी 20I वर्ल्ड कपसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील सहभागी 20 पैकी अनेक संघांची घोषणा करण्यात आली आहे. अशात एका संघामुळे आता आयसीसीसमोर नवं आव्हान आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डामुळे आयसीसीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करावा लागू शकतो. भारत-बांगलादेश यांच्यातील संबंधांमुळे बीसीबीने सामन्यांचं ठिकाण बदलण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे.
बांगलादेशमध्ये हिंदूंना देण्यात येणारी वागणूक, राजकीय परिस्थिती आणि धार्मिक कट्टरवाद्यांनी घातलेला उच्छाद पाहता भारतात संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे बांगलादेशला पाकिस्तानप्रमाणेच वागणूक द्यावी, अशा भावना भारतीयांच्या आहेत. अशात आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी निवड झालेल्या बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी करण्यात आली. मुस्तफिजूरवर केलेली कारवाई बीसीबी अर्थात बांगलादेशला क्रिकेट बोर्डाला चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यानंतर आता बीसीबीकडून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली जात आहे. बीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी केल्याचं म्हटलं जात आहे.
बांगलादेशातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी 4 जानेवारीला बीसीबी अध्यक्षांसह सर्व 17 सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष आणि सदस्यांनी सद्यस्थिती पाहता बांगलादेश क्रिकेट टीमला भारतात टी 20I वर्ल्ड कपसाठी पाठवायचं नाही, असं ठरवलंय.
तसेच मीडिया रिपोर्ट्मध्ये, बीसीबीने आयसीसीला मेलद्वारे बांगलादेशचे भारतातील सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. मात्र याबाबत बीसीबी किंवा आयसीसीने अधिकृत माहिती दिलेली नाही.
नियोजित वेळापत्रकानुसार, बांगलादेश साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने कोलकातात तर उर्वरित 1 मॅच मुंबईत खेळणार आहे. आता आयसीसीने बीसीबीची मागणी केल्यास त्याचा अनेक गोष्टींवर परिणाम होईल. त्यामुळे आयसीसी बीसीबीची मागणी पूर्ण करणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.