3 संघ आणि 13 सामने, Bcci कडून टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. तिन्ही संघ भारतात एकूण 13 सामने खेळणार आहेत. जाणून घ्या वेळापत्रक.

आयपीएलनंतर मेन्स टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दरम्यान बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया ए आणि ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम येणार आहे. त्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेची ए टीमही भारत दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर असणार आहेत. तर साऊथ आफ्रिका ए टीम ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
भारत दौऱ्यात एकूण 3 संघ इंडिया विरुद्ध 13 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया वूमन्स टीम 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया ए टीम या दौऱ्यात 2 मल्टी डे सामने आणि 3 वनडे मॅचेस खेळणार आहे. हे सामने 16 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिका 20 दिवसांसाठी भारत दौऱ्यावर
ऑस्ट्रेलियाचे दोन्ही संघ भारत दौरा आटपून मायदेशी परततील. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ए टीम भारत दौऱ्यावर येईल. साऊथ आफ्रिका ए टीम 30 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकूण 20 दिवस भारत दौऱ्यावर असणार आहे. या दरम्यान 2 मल्टी डे सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया वूमन्स वनडे सीरिज
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स यांच्यातील तिन्ही सामने चेन्नईत आयोजित करण्यात आले आहेत. उभयसंघातील सलामीचा सामना हा 14 सप्टेंबरला होणार आहे. दुसरा सामना 17 सप्टेंबरला खेळवण्यात येईल. तर तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचा थरार 20 सप्टेंबरला रंगेल.
ऑस्ट्रेलिया ए टीम भारत दौऱ्यात सर्व सामने हे लखनौ आणि कानपूरमध्ये खेळणार आहे. उभयसंघात आधी मल्टी डे सामने खेळवण्यात येतील. पहिला सामना हा 16 तर दुसरा सामना 23 सप्टेंबरला पार पडेल. दोन्ही सामने लखनौमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तर कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया ए संघ 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे तिन्ही सामने अनुक्रमे 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला खेळवण्यात येतील.
तसेच साऊथ आफ्रिका ए टीमचे भारत दौऱ्यातील मल्टी डे मॅचेस बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे खेळवण्यात येणार आहेत. तर एकदिवसीय सामन्यांचा थरार हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. मल्टी डे मॅचेस 30 ऑक्टोबर आणि 6 नोव्हेंबरला होणार आहेत. तर एकदिवसीय मालिकेतील 3 सामने अनुक्रमे 13, 16 आणि 19 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येतील.
