
भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. स्टार ऑलराउंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20I नंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला. तर रवींद्र जडेजा याने टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवा शुबमन गिल याला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आता बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. अजित आगरकर यांचा निवड समिती अध्यक्ष म्हणून 2 वर्षांचा कार्यकाळ हा लवकरच संपत आहे. त्यामुळे बीसीसीआय आगरकर यांना मुदतवाढ देणार की नव्या निवड समिती अध्यक्षसाठी अर्ज मागवणार? याची उत्सुकता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित आगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. आगरकर यांनी ऑगस्ट 2023 मध्ये निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार आगरकर यांचा कार्यकाळ 2 महिन्यांनी ऑगस्टमध्ये संपत आहे. मात्र आगरकर यांना आणखी 1 वर्षांची मुदतवाढ मिळाल्यास ते ऑगस्ट 2026 पर्यंत त्या पदावर राहु शकतात.
एखाद्या मालिकेसाठी कोणत्या खेळाडूला संधी द्यावी? कुणाला संधी नाकारावी? याचा बारीक विचार निवड समिती अध्यक्षांना सदस्यांसह करावा लागतो. मात्र आगरकर सर्वेसर्वा झाल्यापासून टीम इंडियाची चमकदार कामगिरी राहिली आहे. आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच वनडे वर्ल्ड कप 2023 चं उपविजेतेपद मिळवलं.आगरकर यांनी अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली. ते खेळाडू यशस्वीही ठरले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक गट अजित आगरकर यांच्यावर नाराज आहेत. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीला अजित आगरकर कारणीभूत असल्याचं काहींचं मत आहे. मात्र बीसीसीआय नको त्या गोष्टी आपला वेळ वाया घालवत नाहीय. आगरकर यांनी कसोटी क्रिकेटसाठीही युवा खेळाडूंना संधी दिली आणि टीम इंडियाची कामगिरी सुधारण्यात हातभार लावला. त्यामुळेच सर्फराज खान आणि नितीश कुमार रेड्डी या युवा खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तसेच आगरकर यांच्या काळातच करुण नायर याला 8 वर्षांनी कमबॅकची संधी मिळाली.
यशस्वी जयस्वाल यालाही आगरकर यांच्या कार्यकाळात संधी मिळाली होती. त्यानंतर यशस्वी अवघ्या काही महिन्यांमध्ये टीम इंडियाचा कायमचा सदस्य झाला. आगरकर यांच्या कामाचा आलेख पाहता बीसीसीआय त्यांचा कार्यकाळ वाढवू शकते.