
कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने नोव्हेंबर महिन्यात टीम इंडियाला पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताच्या मुलींनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आयसीसी, बीसीसीआय राज्य सरकारकडून या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातील कुणाला गाडी बक्षिस म्हणून देण्यात आली. तर कुणाला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. अशात बीसीसीआयने वूमन्स क्रिकेटसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय घेतलाय. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही समसमान मॅच फी मिळणार आहे.
बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याने आता मेन्स आणि वूमन्स खेळाडूंची मॅच फी समसमान झाली आहे. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटू आणि सामनाधिकारी (Match Referee) यांच्या मॅच फीमध्ये तब्बल दुप्पटीपेक्षा जास्त वाढ केली आहे. त्यानुसार आता वनडे आणि मल्टी डे मॅचेससाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये असलेल्या खेळाडूंना एका दिवसासाठी 50 हजार रुपये मिळणार आहेत. तर राखीव खेळाडूंना 25 हजार रुपये मानधन मिळणार आहे.
एका टी 20 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रत्येकी 25 तर इतर खेळाडूंना साडे 12 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याआधी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना 20 तर इतर खेळाडूंना 10 हजार रुपये मानधन देण्यात येत होतं.
तसेच ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेतील महिला खेळाडूंनाही समसमान मानधन दिलं जाणार आहे. त्यानुसार वनडे आणि मल्टी डे सामन्यांसाठी प्लेइंग ईलेव्हनमधील खेळाडूंना प्रतिदिन 25 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. तर राखीव खेळाडूंना 12 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
तर टी 20 सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमधील प्रत्येकीला साडे 12 हजार तर इतर खेळाडूंना (प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसलेले) 6 हजार 250 इतकं मानधन मिळणार आहेत.
खेळाडूंसह पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. पंच आणि सामनाधिकाऱ्यांना देशांतर्गत स्पर्धेतील साखळी फेरीतील क्रिकेट सामन्यासाठी प्रतिदिन 40 तर बाद फेरीतील सामन्यासाठी 50-60 हजार रुपये मिळणार आहेत.
तसेच या वाढीनुसार, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीतील एका सामन्यासाठी 1 लाख 60 हजार तर बाद फेरीतील सामन्यासाठी अडीच ते 3 लाख रुपये देण्यात येणार आहेत.