
मुंबई इंडियन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2025 क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभूत व्हावं लागलं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने पहिले बॅटिंग करताना 203 धावांपर्यंत मजल मारली. तर पंजाबने प्रत्युत्तरात कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेल्या नाबाद खेळीच्या जोरावर 6 बॉलआधी विजय मिळवला. पंजाबने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 207 रन्स केल्या आणि अंतिम फेरीत धडक दिली. मुंबईचं यासह अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
हार्दिकने पंजाबसाठी सर्वाधिक आणि नाबाद 87 धावा करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यर याचं कौतुक केलं. “श्रेयसने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते कौतुकास्पद आहे. श्रेयसने संधीचा फायदा घेतला आणि अप्रतिम फटके मारले. माझ्या हिशोबाने हा बरोबरीचा सामना होता. आम्ही धावसंख्या उभारली होती. मात्र बॉलिंगद्वारे आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती. ही अशी कामगिरी मोठ्या सामन्यात खरंच निर्णायक ठरते”, असं हार्दिकने म्हटलं.
“पंजाबचे फलंदाज खरंच शांत होते. त्यांनी आम्हाला दबावात ठेवलं. मला वाटतं की आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मी खेळपट्टीवर खापर फोडणार नाही. मी जर गोलंदाजांचा योग्य वापर केला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. मागे वळून पाहिलं तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकता”, असं म्हणत हार्दिक पंड्या याने खंत व्यक्त केली.
मुंबई इंडियन्स पराभूत
A season full of grit, character, comebacks and big effort comes to a halt tonight. 💔
Thank you, Paltan for supporting us through thick & thin 💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #PBKSvMI pic.twitter.com/OdQ8KaCBg1
— Mumbai Indians (@mipaltan) June 1, 2025
जसप्रीत बुमराहला या सामन्यात 16 वी ओव्हर टाकायला दिली नाही. हार्दिकला यावरुनच प्रश्न करण्यात आला. पंजाबला 24 बॉलमध्ये 41 धावांची गरज असताना बॉलिंग द्यायला हवी होती का? असा प्रश्न हार्दिकला करण्यात आला. यावर हार्दिक म्हणाला की, “तसं करणं घाईचं झालं असतं. मात्र बुमराहला परिस्थितीचा अंदाज असतो. 18 बॉल बाकी असले तरी जस्सी जस्सी आहे. त्याच्यात खास करण्याची क्षमता आहे. मात्र आज तसं झालं नाही”, असं हार्दिकने नमूद केलं. हार्दिक कर्णधार, फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अपयशी ठरला. हार्दिकने 13 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. तर 2 ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या. मात्र त्यानंतरही हार्दिक बुमराहचं नाव घेण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.