IND vs AUS : 4,4,4,4, विराट कोहलीचं अर्धशतक,ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी

Virat Kohli Fifty IND vs AUS CT 2025 : विराट कोहली याने निर्णायक क्षणी टीम इंडियाचा डाव सावरत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. विराटने यासह एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

IND vs AUS : 4,4,4,4, विराट कोहलीचं अर्धशतक,ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी
virat kohli fifty ind vs aus sf ct 2025
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Mar 04, 2025 | 8:50 PM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात विजयी आव्हानचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. विराटने चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 25 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अ‍ॅडम झॅम्पाला चौकार ठोकला. विराटने यासह एकदिवसीय कारकीर्दीतील 74 वं अर्धशतक झळकावलं. किंग कोहली याने अर्धशतकी खेळीसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

स्टीव्हन स्मिथच्या विक्रमाची बरोबरी

विराटने 53 बॉलमध्ये 94.34 च्या स्ट्राईक रेटने 4 चौकारांसह हे अर्धशतक पूर्ण केलं. विराटने यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी केली. स्टीव्हन स्मिथ याने याच सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 73 धावांची खेळी केली. स्मिथची ही आयसीसी वनडे नॉकआऊटमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. विराटने त्यानंतर आता काही तासांनीच स्टीव्हनच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटची ही आयसीसी वनडे नॉकआऊटमधील 50 पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली. सचिन तेंडुलकरच्या नावावर आयसीसी वनडे नॉकआऊटमध्ये सर्वाधिक 6 वेळा 50 पेक्षा अधिक धावांच्या विश्व विक्रमाची नोंद आहे.

श्रेयससह महत्त्वाची भागीदारी

दरम्यान विराटने या अर्धशतकी खेळीदरम्यान श्रेयस अय्यर याच्यासह तिसर्‍या विकेटसाठी महत्त्वाची भागीदारी करत टीम इंडियाच्या डावाला स्थिरता दिली. टीम इंडियाने 265 धावांचा पाठलाग करताना 43 धावांवर कर्णधार रोहित शर्माच्या रुपात दुसरी विकेट गमावली. त्यानंतर विराटने श्रेयस अय्यर याच्यासोबत डाव सावरला. दोघांनी संधी मिळेल तेव्हा फटकेही मारले. अशापक्रारे दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.

विराट अर्धशतक

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), कूपर कॉनोली, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झॅम्पा आणि तनवीर संघा.

टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.