दक्षिण अफ्रिकेला मिळणार थेट अंतिम फेरीत संधी! उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीचे चारही संघ ठरले आहेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत खेळणार आहेत. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केल्याने दक्षिण अफ्रिकेला फायदा झाला आहे.

दक्षिण अफ्रिकेला मिळणार थेट अंतिम फेरीत संधी! उपांत्य फेरीचं गणित समजून घ्या
| Updated on: Mar 02, 2025 | 9:57 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असे सामने होणार आहेत. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे असंच म्हणावं लागेल.दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीचं थेट तिकीटही मिळू शकतं. त्यासाठी तसंच समीकरण असल्याने दक्षिण अफ्रिकेचा फायदाच आहे. पण यामुळे न्यूझीलंडला मात्र फटका बसू शकतो. नेमकं काय समीकरण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या नेमकं काय ते

पाकिस्तानातील हवामान आता लहरी असल्याचं दिसून आहे. अवकाळी पावसाचा तीन सामन्यांना फटका बसला आहे. साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे तीन सामना पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली. त्यामुळे उपांत्य फेरीतही असाच पाऊस पडला तर अंतिम फेरीचं गणित काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना 5 मार्चला होणार आहे.

पाकिस्तानमधील गद्दाफी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. याच मैदानात अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला होता. तसेच ऑस्ट्रेलियाला थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं होतं. पण उपांत्य फेरीत न्यूझीलंडला तसा फायदा मिळणार नाही. 5 मार्चला पावसामुळे सामना रद्द झाला तर त्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस ठेवला आहे. पण या दिवशीही सामना रद्द झाला तर मात्र अंतिम फेरीचं तिकीट दक्षिण अफ्रिकेला मिळेल. कारण ब गटात 6 गुणांसह दक्षिण अफ्रिकेचा संघ टॉपला आहे. त्यामुळे त्यांना थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळेल.