Rohit Sharma : रोहितच्या कसोटी निवृत्तीचं खरं कारण समोर, बालपणीचे कोच दिनेश लाड म्हणाले..

Dinesh Lad On Rohit Sharma Test Retirement : रोहितने दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनात बालपणी क्रिकेटचे धडे गिरवले. दिनेश लाड यांनी टीम इंडियाला रोहित शर्मा याच्यासारखा दिग्गज खेळाडू दिला. दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर काय प्रतिक्रिया दिली? जाणून घ्या.

Rohit Sharma : रोहितच्या कसोटी निवृत्तीचं खरं कारण समोर, बालपणीचे कोच दिनेश लाड म्हणाले..
Dinesh Lad and Rohit Sharma
Image Credit source: TV9 and PTI
| Updated on: May 08, 2025 | 7:00 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. रोहितच्या या अशा तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. रोहितने टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर झटपट निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर रोहितने पुन्हा त्याच प्रकारे कसोटी क्रिकेटला अलविदा केला. मात्र रोहितने वनडे क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. रोहितने इंस्टा स्टोरीतून आपण एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता रोहितच्या वनडे क्रिकेटमधील रिटायरमेंटबाबतही चर्चा सुरु झाली आहे. रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृ्त्तीबद्दल त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मोठी अपडेट दिली. दिनेश लाड यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. रोहितचं 2027 साली होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं लाड यांनी सांगितलं.

दिनेश लाड काय म्हणाले?

“रोहितचं 2027 सालचा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य आहे. रोहितने त्यानंतर निवृत्त व्हावं”, असं लाड म्हणाले. तसेच रोहितने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय का घेतला? या असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तरही लाड यांनी दिलं.

रोहित शर्मा याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विजयी होण्याचं लक्ष्य होतं. मात्र दुर्देवाने टीम इंडिया क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. आता 2027 साली वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे रोहितने हा वर्ल्ड कप जिंकावा आणि त्यानंतर निवृत्त व्हावं”, असं लाड यांनी म्हटलं. आगामी वनडे वर्ल्ड कपचं आयोजन हे 2027 साली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा झिंबाब्वे आणि नामिबियाकडे आहे.

रोहितच्या निवृत्तीवर लाड यांची प्रतिक्रिया काय?

रोहितचा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्याच्या करियरच्या दृष्टीने धोरणात्मक असल्याचं लाड यांनी म्हटलं. “रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय गडबडीत घेतलेला नाही. रोहितची गेल्या वर्ल्ड कपनंतर टी 20 क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा नव्हती. मात्र रोहितला वनडे आणि टेस्टमध्ये खेळायचं होतं. रोहितने त्याच्यासाठी सर्वोत्तम काय आहे? याबाबत त्याने विचार केला असेल”, असं लाड यांनी नमूद केलं