
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साली पाकिस्तानात होणार यावर आयसीसीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेवरून बराच वाद सुरु आहे. कारण टीम इंडियाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला आहे. दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या देशात जायचं नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर करावी अशी विनंतरी बीसीसीआयने केली आहे. या मॉडेल अंतर्गत भारतीय संघ आशिया चषकाप्रमाणे दुबई किंवा श्रीलंकेत सामने खेळेल. या मागणीमुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारताने पाकिस्तानात खेळायला यावं यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होत आहेत. पण भारताने या प्रयत्नांना केराची टोपली दाखवली आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तानी मिडियामध्ये चर्चांचा फड रंगला आहे. असं असताना या चर्चेत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने भाग घेतला होता. पाकिस्तानी चॅनेलवर हरभजन सिंग गेस्ट म्हणून भाग घेतला होता. यावेळी पत्रकार आणि माजी खेळाडूंना भिडला.
अँकरने प्रश्न विचारला की, टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही का? नुकताच दिग्गज संघांनी पाकिस्तान दौरा केला आहे. यावर हरभजन सिंगने सांगितलं, टीम इंडिया पाकिस्तानात अजिबात येणार नाही. टीम इंडियाला पाकिस्तानची गरज नाही. जर तुम्ही भारताशिवाय करू शकता तर जे हवं ते करा. पाकिस्तानी मीडियातील बातम्यांनुसार, टीम इंडिया पाकिस्तानात आली नाही तर श्रीलंकेला खेळण्याची संधी दिली जाईल. हरभजनने यात बातमीवरून पाकिस्तान पत्रकाराला खडे बोल सुनावले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती एकदम नाजूक आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून गयावया सुरु आहे.
Indian cricket can survive without pakistan 🔥
Harbhajan Singh on fire pic.twitter.com/NVtkJzX7o9
— Politics Pe Charcha (@politicscharcha) July 12, 2024
आशिया कप चषकातही असंच काहीसं झालं होतं. भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तान झुकलं आणि हायब्रीड मॉडेलवर स्पर्धा खेळण्याची तयारी दर्शवली. भारताने सर्व सामने श्रीलंकेत खेळले. इतकंच काय तर रोहित शर्माच्या नेतृत्वात आशिया चषकावर नाव कोरलं. त्यानंतर पाकिस्तान संघ भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी आला होता. मात्र साखळी फेरीतच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.