War : जगाला वाईट दिवस पहावे लागणार, 2026 मध्ये या 5 ठिकाणी होऊ शकते युद्ध
War 2026 : येणारे वर्ष अनेक देशांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. काही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या ठिकाणी युद्धाची शक्यता आहे ते जाणून घेऊयात.

अवघ्या काही दिवसांमध्ये आपण 2025 चा निरोप घेणार आहोत. 2026 हे वर्ष अनेकांसाठी नवी आशा घेऊन येणार आहे. 2026 मध्ये अनेक बदल होणार आहेत. मात्र सुरक्षा क्षेत्रातील जाणकार मंडळी आगामी वर्षात नवीन संकट घेऊन येण्याची शक्यता वर्तवत आहेत. येणारे वर्ष अनेक देशांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. काही देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे. तसेच वादग्रस्त निवडणुका, प्रादेशिक युतींमध्ये बदल आणि वाढत्या लष्करी हालचालींमुळे नवीन भू-राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ACLED (सशस्त्र संघर्ष स्थान आणि घटना डेटा) नुसार, जगातील बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार वाढला आहे. यामागे लहान सशस्त्र गट, टोळ्या आणि युती ही कारणे आहेत. कारण या गटांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा, स्थलांतर आणि जागतिक राजकारणावर खोलवर परिणाम होऊ शकतो. आगामी वर्षात पुढील ठिकाणी युद्ध होण्याची शक्यता आहे.
लॅटिन अमेरिका – व्हेनेझुएला आणि शेजारील देश
2026 मध्ये लॅटिन अमेरिका हा सर्वात अस्थिर प्रदेश असण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलातील राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. यामुळे बोलिव्हिया, कोस्टा रिका, पेरू, ब्राझील, कोलंबिया आणि चिलीसह अनेक देश सुरक्षेच्या नावाखाली लष्कराची ताकद वाढवत आहेत. यामुळे हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होण्याचा धोका वाढला आहे. इक्वेडोर हा या प्रदेशातील एक प्रमुख हॉटस्पॉट बनला आहे, जिथे हिंसाचार, तुरुंगातील उठाव आणि ड्रग्ज नेटवर्क देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
रशिया- युक्रेनमधील तणाव
रशिया आता युक्रेनच्या डोनेस्तकमध्ये मोठी लष्करी कारवाई करत असून या शहरांवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढू शकतो.
आशिया – म्यानमार आणि पाकिस्तान
म्यानमारमध्ये लष्कर निवडणुका घेऊन सत्तेवरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनतेचा आणि बंडखोर गटांचा याला विरोध आहे. चीनच्या पाठिंबा असूनही, देशात हिंसाचार आणि अराजकता वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), बलुच बंडखोरी आणि अफगाण सीमेवरील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इस्रायल आणि इराण
2025 मध्ये इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध झाले होते. इस्रायलला आता गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इराणसह अनेक ठिकाणी तणावाचा सामना करावा लागत आहे. इराण आपल्या लष्करी आणि आण्विक क्षमतांचा विस्तार करत आहे त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आफ्रिका – साहेल आणि सुदान
साहेल प्रदेशात आयसिस आणि अल-कायदाशी संबंधित संघटनांचा विस्तार होत आहे. सुदानमधील एसएएफ (सुदान सशस्त्र दल) आणि आरएसएफ (रॅपिड सपोर्ट फोर्सेस) यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामुळे 2026 मध्ये या ठिकाणीही तणाव वाढण्याची शक्यता आहे.
