Cricket 2024 : टीम इंडियासाठी नववर्ष महत्त्वाचं! आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करण्याची आणखी संधी

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून गणना होते. पण आयसीसी चषकांच्या बाबतीत कमनशिबी म्हणावा लागेल. अनेकदा हातीतोंडी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. एक चषक जिंकल्यानंतर दुसऱ्या चषकासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. 2023 या मागच्या वर्षात दोन संधी हुकल्या. आता या वर्षी पुन्हा एकदा संधी आहे.

Cricket 2024 : टीम इंडियासाठी नववर्ष महत्त्वाचं! आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करण्याची आणखी संधी
24वं वरीस मोक्याचं! टीम इंडियाला आयसीसी चषकासाठी महत्त्वाचं वर्ष, 10 वर्षांचा दुष्काळ संपणार?
| Updated on: Jan 01, 2024 | 3:18 PM

मुंबई : नवं वर्ष 2024 सुरु झालं असून या वर्षी तरी टीम इंडिया आयसीसी चषकाचा दुष्काळ दूर करणार का? हा प्रश्न पडला आहे. भारताने शेवटचा आयसीसी चषक 2013 साली जिंकला होता. त्यानंतर भारताची आयसीसी चषक मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. ही अनेकदा हुकली असून क्रीडाप्रेमींनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दोन वेळा ऑस्ट्रेलियाला भारताला पराभवाचं पाणी पाजलं. आता 2024 या वर्षात आणखी एक संधी आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत 20 संघांचा समावेश असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद जिंकून 17 वर्षांचा कालावधी लोटला आहे. भारताने 2007 मध्ये पहिलं जेतेपद जिंकलं होतं. 2024 स्पर्धेत 12 कसोटी, तीन वनडे आणि 9 टी20 सामने खेळणार आहे. यात टी20 वर्ल्डकप शेड्युलचा समावेश नाही.

2024 या वर्षाच्या सुरुवातीला अर्थात 3 जानेवारीपासून टीम इंडिया दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. त्यानंतर टी20 वर्ल्डकपपर्यंत कोणताही टी20 सामना नाही. इंग्लंड विरुद्ध 25 जानेवारी ते 11 मार्चपर्यंत कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होईल आणि मग टी20 वर्ल्डकपची मेजवानी मिळेल.

  • 3 जानेवारी ते 7 जानेवारी,भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका,दुसरा कसोटी सामना
  • 11 जानेवारी ते 17 जानेवारी,भारत विरुद्ध अफगाणिस्तान,3 सामन्यांची टी20 मालिका
  • 25 जानेवारी ते 11 मार्च, भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची कसोटी मालिका
  • 4 जून ते 30 जून, आयसीसी टी20 वर्ल्डकप
  • जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका
  • सप्टेंबर बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी20 सामन्यांची मालिका
  • ऑक्टोबर न्यूझीलंड विरुद्ध भारत, तीन सामन्यांची कसोटी मालिका
  • नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका

टीम इंडियाचे खेळाडू 11 मार्चनंतर मे पर्यंत इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत व्यस्त असेल. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील निकालावर भारताचं अंतिम फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे.