
बीसीसीआय निवड समितीने गुरुवारी 18 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. दोन्ही मालिका या 3-3 सामन्यांच्या असणार आहेत. दोन्ही मालिकेत मुंबईकर खेळाडूंकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सूर्यकुमार यादव टी20i आणि रोहित शर्मा वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमारला टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर शुबमन गिलला दोन्ही मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
गौतम गंभीर या श्रीलंका दौऱ्यातून हेड कोच म्हणून आपल्या प्रवासाचा श्रीगणेशा करणार आहे. या दौऱ्यातील दोन्ही मालिकेतून काही खेळाडूंना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. यामागे गौतम गंभीर याचा हात असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. अनेक खेळाडूंना चांगली कामगिरी करुनही वगळण्यात आलंय. मात्र सीएसकेच्या तब्बल 4 खेळाडूंना संधी न मिळाल्याने यामागे गंभीरच असल्याची नेटकऱ्यांकडून शंका व्यक्त केली जात आहे.
रवींद्र जडेजा याने टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती घेतली. जडेजाचा श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये निवड करण्यात आलेली नाही. तसेच शार्दूल ठाकुर, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे या त्रिकुटालाही दोन्ही मालिकांमध्ये संधी देण्यात आली नाही. ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे हे दोघे झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्ये खेळलेत. ऋतुराजने आतापर्यंत टी20 फॉर्मेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र त्याला संधी मिळाली नाही.
तसेच तुषार देशपांडेसह अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांनीही झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मात्र रियान पराग याची दोन्ही मालिकेत निवड केली गेली आहे. तर तुषार आणि अभिषेक या दोघांना वगळलं आहे. अभिषेकने झिंबाब्वे विरुद्ध दुसऱ्या टी 20i सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यानंतरही त्याला वगळलं आहेत. तसेच ऑलराउंडर शार्दूल ठाकुर हा गेल्या अनेक महिन्यांपासून दूर आहे. त्यालाही संधी दिलेली नाही.
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.