
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील ही पहिलीच मालिका आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 20 ते 24 जून दरम्यान हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. शुबमन गिल याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. गिलची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. तर दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला.
कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या शुबमन गिल याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला नाही. इंग्लंडने टॉस जिंकला आणि कर्णधार बेन स्टोक्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आम्ही टॉस जिंकला असता तर बॉलिंगचाच निर्णय घेतला असता, असंही शुबमनने सांगितलं.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिल याच्यासह ओपनिंग करणाऱ्या साई सुदर्शन याने इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने साईला कॅप देत शुभेच्छा दिल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेड कोच गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यासाठी साई सुदर्शन याला संधी देण्यासाठी तयार नव्हता. मात्र शुबमनने साईसाठी गंभीरची मनधरणी केली. त्यानंतर आता साईला थेट पहिल्याच सामन्यात संधी मिळाली आहे. साई तिसऱ्या स्थानी खेळणार आहे. साईने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे साई पदार्पणात कसा खेळतो? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
करुण नायरचं कसोटी संघात तब्बल 8 वर्षांनी कमबॅक झालं आहे. करुण नायर याने अखेरचा कसोटी सामना हा 25 मार्च 2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता करुणला निवड समितीने त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या जोरदार कामगिरीमुळे इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली. करुण नायर याने इंग्लंड लायन्स विरुद्ध अनऑफिशियल टेस्टमध्ये द्विशतक करुन प्लेइंग ईलेव्हनसाठी दावा ठोकला होता. आता करुण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर कशी कामगिरी करतो? याची प्रतिक्षा चाहत्यांना असणार आहे.
इंग्लंडने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨
England win the toss and elect to bowl against #TeamIndia in the 1st Test.
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/5aL2yN5K3s
— BCCI (@BCCI) June 20, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा.