
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि सलामीवीर केएल राहुल याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. केएलने अर्धशतकी खेळी करत उपकर्णधार ऋषभ याच्यासोबत टीम इंडियाचा डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 387 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने टीम इंडियाला 3 झटके दिले. मात्र त्यानंतर केएल आणि पंत जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला ठराविक अंतराने 3 झटके दिले. भारताने पहिली विकेट 13 रन्सवर गमावली. ओपनर यशस्वी जैस्वाल याने 13 धावा केल्या. त्यानंतर केएल राहुल आणि करुण नायर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर करुण 40 रन्सवर आऊट झाला. कर्णधार शुबमन गिल या सामन्यातील पहिल्या डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शुबमनने 16 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची स्थितीत 3 आऊट 107 अशी झाली. त्यामुळे आता इथून अनुभवी फलंदाज म्हणून केएलवर डाव सावरण्याची जबाबदारी केएलवर आली.
केएलने हे जबाबदारी सार्थपणे पार पाडली. केएलने एकेरी-दुहेरी धाव जोडत भागीदारी वाढवली. केएलने या दरम्यान 39 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. केएलने 97 चेंडूत 51.55 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. केएलने या अर्धशतकी खेळीत 5 चौकार लगावले. केएलचं हे कसोटी कारकीर्दीतील 19 वं अर्धशतक ठरलं.
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 43 ओव्हरमध्ये 145 रन्स केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया अजूनही 242 धावांनी पिछाडीवर आहे. ऋषभ पंत 19 धावांवर नाबाद परतला आहे. तर केएल 53 रन्सवर नॉट आऊट आहे. त्यामुळे या जोडीसमोर तिसऱ्या दिवशी इंग्लंडची आघाडी मोडीत काढण्याचं आव्हान असणार आहे. तसेच केएलला या दरम्यान लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक करण्याची संधी आहे.
केएलने याआधी 2021 च्या दौऱ्यात लॉर्ड्समध्ये पहिल्या डावात 129 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आता केएलकडे या ऐतिहासिक मैदानात सलग आणि एकूण दुसरं कसोटी शतक करण्याची संधी आहे. आतापर्यंत टीम इंडियाकडून एकूण 10 फलंदाजांनी लॉर्ड्समध्ये शतक केलं आहे. दिलीप वेंगसरकर यांनी भारतासाठी सर्वाधिक 3 वेळा लॉर्ड्समध्ये शतक केलं आहे. तर इतर 9 फलंदाजांनी प्रत्येकी 1-1 वेळा शतक ठोकलंय. त्यामुळे केएल टीम इंडियासाठी लॉर्ड्समध्ये 1 पेक्षा अधिक शतक करणारा दुसरा फलंदाज ठरणार का? या प्रश्नाचं उत्तर हे तिसऱ्या दिवशीच मिळेल.