Shubman Gill चा कारनामा, राहुल द्रविडचा 23 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड ब्रेक

Shubman Gill ENG vs IND : शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध बॅटिंगने आतापर्यंत ऐतिहासिक कामगिरी केलीय. शुबमनने यासह माजी फलंदाज राहुल द्रविड याला मागे टाकलं आहे.

Shubman Gill चा कारनामा, राहुल द्रविडचा 23 वर्षांपूर्वीचा महारेकॉर्ड ब्रेक
Shubman Gill Team India Captain
Image Credit source: @ShubmanGill X Account
| Updated on: Jul 14, 2025 | 8:51 PM

शुबमन गिल याने इंग्लंड दौऱ्यातून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमन टीम इंडियाला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र शुबमन आणि टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आणि इंग्लंडला पराभवाची धुळ चारली. शुबमनने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी केली. शुबमनने यासह भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. मात्र शुबमनला हाच झंझावात तिसऱ्या सामन्यात कायम ठेवता आला नाही.

शुबमनने तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 16 धावा केल्या. तर शुबमनला दुसर्‍या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मात्र शुबमनने दुसऱ्या डावात 6 धावा करण्यासाठी माजी फलंदाज राहुल द्रविड याचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमनने इंग्लंडच्या भूमीत राहुल द्रविड याने 23 वर्षांपूर्वी केलेला महारेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला.

द्रविडचा विक्रम मोडीत

शुबमनने आतापर्यंत अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतील 3 सामन्यांमधील 6 डावांत एकूण 607 धावा केल्या. शुबमन यासह एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 2002 साली एका मालिकेत 600 पेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली होती.

इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय

शुबमन गिल – 607 धावा
राहुल द्रविड – 602 धावा
विराट कोहली – 593 धावा
सुनील गावसकर – 542 धावा
राहुल द्रविड – 461 धावा
सचिन तेंडुलकर – 428 धावा

‘द वॉल’ द्रविड

द्रविडने 2002 साली इंग्लंड दौऱ्यातील एका मालिकेत 602 धावा केल्या होत्या. तर आता शुबमनने फक्त 3 सामन्यांतच द्रविडला मागे टाकलं आहे. त्यामुळे द्रविडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानी माजी फलंदाज विराट कोहली विराजमान आहे. विराटने 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध 593 धावा केल्या होत्या. तर चौथ्या स्थानी लिटिल मास्टर अर्थात सुनील गावसकर आहेत. गावसकर यांनी 1979 साली 542 धावा केल्या होत्या.

मालिका 1-1 ने बरोबरीत

दरम्यान उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 2 सामन्यांनंतर 1-1 ने बरोबरीत आहे. तर तिसरा सामना हा ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून कोणता संघ मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतं? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.