Ravindra Jadeja चं मँचेस्टरमध्ये ऐतिहासिक शतक, इंग्लंडवर तिसऱ्यांदा निशाणा

Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजाने मँचेस्टर कसोटीतील चौथ्या कसोटीतील पाचव्या दिवशी तिसऱ्या सत्रात शतक झळकावलं. जडेजाने या दरम्यान चौफेर फटके लगावले.

Ravindra Jadeja चं मँचेस्टरमध्ये ऐतिहासिक शतक, इंग्लंडवर तिसऱ्यांदा निशाणा
Ravindra Jadeja Century
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 28, 2025 | 12:52 AM

टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने वॉशिंग्टन सुंदर याच्यासह नाबाद द्विशतकी भागीदारी करत मँचेस्टरमधील चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात निर्णायक भूमिका बजावली. जडेजाने या दरम्यान इंग्लंड दौऱ्यात अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवत ऐतिहासक शतक झळकावलं. जडेजाचं ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात शतक हुकलं होतं. मात्र जडेजाने मँचेस्टरमध्ये ही भरपाई केली आणि शेकडा पूर्ण केला. जडेजाच्या कसोटी कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरंलं. जडेजा यासह इंग्लंड दौऱ्यात शतक करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.

भारताने 311 धावांच्या प्रत्युत्तरात 222 धावावंर शुबमन गिल याच्या रुपात चौथी विकेट गमावली. त्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात आला. जडेजाने सुंदरसोबत शेवटपर्यंत साथ दिली आणि नाबाद परतला. जडेजाने सुंदरसह पाचव्या विकेटसाठी नाबाद 203 धावांची भागीदारी केली. जडेजाने या दरम्यान शतक पूर्ण केलं. जडेजाने 141 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिक्स ठोकत शतक पूर्ण केलं. जडेजाने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 182 चेंडूंचा सामना केला. जडेजाने या शतकी खेळीत 1 षटकार आणि 12 चौकार लगावले.

इंग्लंड विरुद्धचं सलग तिसरं शतक

जडेजाच्या कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्धचं तिसरं कसोटी शतक ठरलं. विशेष म्हणजे जडेजाने कसोटी कारकीर्दीतील 5 पैकी गेली 3 शतकं ही इंग्लंड विरुद्धच केली आहेत. जडेजाने गेल्या वर्षी राजकोटमध्ये इंग्लंड विरुद्ध शतक केलं. त्याआधी जडेजाने 2022 साली बर्मिंगहॅममध्ये शतक केलं होतं. जडेजाची इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये शतक करण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली.

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीत शतक करणारे भारतीय फलंदाज

  1. यशस्वी जैस्वाल
  2. केएल राहुल
  3. शुबमन गिल
  4. ऋषभ पंत
  5. रवींद्र जडेजा

जडेजाने दुसऱ्या डावात 185 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 57.84 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 107 धावा केल्या. जडेजाने त्याआधी पहिल्या डावात 40 बॉलमध्ये 20 रन्स केल्या. तसेच पहिल्या डावात इंग्लंडला सर्वाधिक 4 झटकेही दिले.

पाचवा सामना निर्णायक

दरम्यान चौथा कसोटी सामना अनिर्णित राखल्यानंतरही टीम इंडिया या 5 मॅचच्या सीरिजमध्ये 2-1 ने पिछाडीवर आहे. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून होणार आहे. त्यामुळे भारताला इंग्लंडला मालिका विजयापासून रोखायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. पाचव्या सामन्याला फक्त 3 दिवस शेष आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाचव्या सामन्यात कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधत इंग्लंडला रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.