
कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने चौथ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत झुंजार आणि नाबाद शतकी भागीदारी करत भारताला सावरलं आहे. इंग्लंडने टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात 669 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे पहिल्या डावात 311 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने त्यानंतर टीम इंडियाला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. ख्रिस वोक्स याने यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या जोडीला भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे भारताची स्थिती 2 आऊट 0 अशी झाली होती. मात्र त्यानंतर शुबमन आणि केएल या जोडीने झुंजार खेळी करत भारताचा डाव सावरला. भारताने 63 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 174 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया 137 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता टीम इंडिया पाचव्या दिवशी अशीच खेळी करुन सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाची दुसऱ्या डावातील सुरुवात निराशाजनक झाली. ख्रिस वोक्सने दिलेल्या 2 झटक्यांमुळे टीम इंडियाचा चौथ्याच दिवशी पराभव होतो की काय, असं वाटत होतं. मात्र त्यानतंर शुबमन गिल आणि केएल राहुल या जोडीने भारताला सावरलं. या जोडीने फार संयमाने एकेरी-दुहेरी धावा जोडल्या. दोघांनी या दरम्यान वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. दोघांनी खेळ संपेपर्यंत 63 ओव्हरमध्ये 174 धावा केल्या. केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या. केएलने 210 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 87 धावा केल्या. तर शुबमन गिल 167 बॉलमध्ये 78 रन्सवर नॉट आऊट आहे. आता या जोडीकडून पाचव्या आणि अंतिम दिवशी अशाच चिवट भागीदारीची अपेक्षा असणार आहे.
त्याआधी यजमान इंग्लंडचा पहिला डाव 669 धावांवर आटोपला. इंग्लंडने यासह 311 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडसाठी जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीने सर्वाधिक धावा केल्या. जो रुट याने 248 बॉलमध्ये 150 रन्स केल्या. तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 141 धावा केल्या. स्टोक्सने या दरम्यान कसोटी कारकीर्दीतील 14 वं शतक झळकावलं. तसेच इंग्लंडच्या इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. भारताकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
केएल-शुबमनची झुंज
Stumps on Day 4 in Manchester! 🏟️
A splendid partnership between Captain Shubman Gill (78*) & KL Rahul (87*) takes #TeamIndia to 174/2 👏👏
A gripping final day of Test cricket awaits ⏳
Scorecard ▶️ https://t.co/L1EVgGu4SI#ENGvIND pic.twitter.com/1EMrsu90I3
— BCCI (@BCCI) July 26, 2025
त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या. टीम इंडियाकडून साई सुदर्शन, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.