ENG vs IND : टीम इंडिया चौथ्या कसोटीत 3 विकेटकीपरसोबत खेळणार?
England vs India 4th Test : ऋषभ पंत याला लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला सामन्यात विकेटकीपिंग करता आली नाही. पंतच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही.

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानात इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा चौथ्या सामन्यात विजय मिळवून या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार असणार आहे. मात्र टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी काही बदल करावे लागू शकतात. त्याचं कारणही तसंच आहे. टीम इंडियातील काही खेळाडूंना दुखापत आहे. भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापत आहे.त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतीय संघ चौथ्या सामन्यात 3 विकेटकीपरसह मैदानात उतरू शकते.
ऋषभ पंत याला लॉर्ड्समध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी विकेटकीपिंग करताना दुखापत झाली होती. पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे पंतला पुन्हा विकेटकीपिंग करता आली नाही. मात्र पंतने त्यानंतरही दोन्ही डावात बॅटिंग केली. पंतने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. मात्र पंतला दुसऱ्या डावात दुखापतीमुळे अधिक त्रास होत असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे पंत लवकर आऊट झाला.
पंतच्या दुखापतीवर कोचकडून अपडेट काय?
पंत चौथ्या कसोटी सामन्यापर्यंत फिट होईल, असं कर्णधार शुबमन गिल याने लॉर्ड्समधील पराभवानंतर म्हटलं होतं. मात्र आता सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेश्काटे यांनी पंतबाबत नक्की काय अपडेट दिली याबाबत जाणून घेऊयात.
“पंत मँचेस्टर सामन्याआधी बॅटिंग करेल. मला नाही वाटत की पंतला कोणत्याही स्थितीत टीममधून बाहेर ठेवायला हवं. पंत विकेटकीपिंग करु शकणार की नाही? हे आम्हाला निश्चित करायचं आहे. पुन्हा सामन्यादरम्यान विकेटकीपर बदलावा लागू नये असं आम्हाला वाटतं”, असं रायन टेन डेश्काटे याने म्हटलं.
3 विकेटकीपर खेळाडूंना संधी मिळणार?
पंत मँचेस्टर टेस्टपर्यंत पूर्णपणे फीट होईल आणि बॅटिंगसह विकेटकीपर अशा दोन्ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडेल, असा विश्वास टेन डेश्काटे यांनी व्यक्त केला. मात्र पंत तोवर फिट होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र पंतला खेळवण्यासाठी टीम मॅनेजमेंट इच्छुक असल्याचं टेन डेश्काटे यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होतं. मात्र पंतला फक्त बॅट्समन म्हणून संधी देण्यात आल्यास विकेटकीपर म्हणून कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. अशात टीम इंडियाकडे केएल राहुल आणि ध्रुव जुरेल हे 2 पर्याय आहेत.
केएल राहुल भारतासाठी सलामीला येतो. तसेच केएलची कामगिरी पाहता त्याला विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात येईल असं वाटत नाही. त्यामुळे ध्रुव जुरेल हा शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे टीम इंडिया चौथ्या कसोटीत एकूण 3 विकेटकीपर खेळाडूंसह मैदानात उतरु शकते.
