ENG vs IND : लय खेळलास, निघ आता! आकाश दीपकडून बेन डकेटला असा निरोप, पाहा व्हीडिओ

Akash Deep and Ben Duckett : आकाश दीप याने बेन डकेट याला आऊट करत इंग्लंडला पहिला झटका दिला. त्यानतंर आकाश आणि डकेट या दोघांमध्ये संवाद पाहायला मिळाला. जाणून घ्या नक्की काय झालं?

ENG vs IND : लय खेळलास, निघ आता! आकाश दीपकडून बेन डकेटला असा निरोप, पाहा व्हीडिओ
Ben Duckett and Akash Deep
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 01, 2025 | 7:31 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताला पहिल्या डावात 20 धावांच्या मोबदल्यात 4 झटके देत 224 धावांवर गुंडाळलं. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीकडून दुसऱ्या दिवशी मोठ्या भागीदारीची आशा होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारताने दुसऱ्या दिवशी गुडघे टेकले. इंग्लंडने भारताला झटपट गुंडाळून मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. त्यानंतर इंग्लंडच्या सलामी जोडीने स्फोटक खेळी करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली होती. मात्र आकाश दीप याने बेन डकेटला आऊट करत ही जोडी फोडली. आकाशने त्यानंतर बेन डकेटसोबत असं काही केलं ज्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

नक्की काय झालं?

बन डकेट आणि झॅक क्रॉली या सलामी जोडीन मैदानात येताच टॉप गिअरमध्ये बॅटिंग करायला सुरुवात केली. या दोघांनी वनडे स्टाईल बॅटिंग केली. पाहता पाहता ही जोडी शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. अखेर आकाश दीप याला ही जोडी फोडण्यात यश आलं. आकाशने बेन डकेट याला 13 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट केलं. डकेटने 38 बॉलमध्ये 113.16 च्या स्ट्राईक रेटने 2 सिक्स आणि 5 फोरसह 43 रन्स केल्या.

डकेट आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर निघाला. तेव्हा आकाशने खांद्यावर हात ठेवत चालता चालता डकेटला काही तरी म्हटलं. मात्र डकेट यावर व्यक्त झाला नाही. तेव्हा केएलने आकाशला डकेटपासून दूर केलं. मात्र या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बेन डकेट याला आकाश दीपकडून असा निरोप

टीम इंडियाचा पहिला डाव

दरम्यान भारतासाठी पहिल्या डावात करुण नायर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. करुणने 109 बॉलमध्ये 52.29 च्या स्ट्राईक रेटने 57 रन्स केल्या. करुणने 57 पैकी 32 धावा या 8 चौकारांच्या मदतीने केल्या. करुण व्यतिरिक्त साई सुदर्शन याने 38 तर वॉशिंग्टन सुंदर याने 26 धावा जोडल्या. तर इंग्लंडसाठी गस एटकीन्सन याने भारताच्या सर्वाधिक 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.