ENG vs IND : गस एटकीन्सनचा पंजा, टीम इंडियाचं 224 धावावंवर पॅकअप, करुण नायरचं झुंजार अर्धशतक
England vs India 5th Test : इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 झटके देत भारताला पहिल्या डावात 224 धावांवर रोखलं.

इंगलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. मात्र केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी घोर निराश केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 250 पारही पोहचता आलं नाही. भारतासाठी करुण नायर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. करुणने केलेल्या अर्धशतकामुळे भारताला 200 पार पोहचता आलं. इंग्लंडने भारताला 224 धावांवर गुंडाळलं. भारताला झटपट गुंडाळण्यात गस एटकीन्सन याने प्रमुख भूमिका बजावली. एटकीन्सन याने इंग्लंडसाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी गसला चांगली साथ दिली.
टीम इंडियाचं झटपट पॅकअप
भारताला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फक्त 20 धावाच जोडता आल्या. भारताने पहिल्या दिवसापर्यंत 64 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या जोडीकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र या दोघांसह इतरांनी निराशा केली.
करुण आणि सुंदर या दोघांना दुसऱ्या दिवशी फक्त 14 धावाच जोडता आल्या. त्यानंतर भारताने 218 धावांवर करुण नायर याच्या रुपात सातवी विकेट गमावली. करुणने 109 बॉलमध्ये 8 फोरसह 57 रन्स केल्या. त्यानंतर इंग्लंडने भारताला झटपट 3 झटके देत गुंडाळलं. करुणनंतर सुंदर 26 धावांवर बाद झाला. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. प्रसिध आऊट होताच भारताचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताने अशाप्रकारे अवघ्या 6 धावांच्या मोबदल्यात शेवटच्या 4 विकेट्स गमावल्या.
पहिल्या दिवशी निराशा
दरम्यान त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला 6 झटके दिले. भारताच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आलं नाही. यशस्वी जैस्वाल 2 धावा करुन आऊट झाला. केएल राहुल 14 धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल या तिघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या तिघांपैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. गिल 21 धावांवर स्वत:च्याच कॉलवर रन आऊट झाला.
भारताचं 224 धावांवर पॅकअप
Innings Break!
Karun Nair top-scores with 57(109) as #TeamIndia post 2⃣2⃣4⃣ in the first innings at the Oval.
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/L7BjTjtpb4
— BCCI (@BCCI) August 1, 2025
साईने 108 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. तर ध्रुव जुरेल याने 19 धावांचं योगदान दिलं. तसेच रवींद्र जडेजा यालाही काही खास करता आलं नाही. जडेजा 9 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची 6 बाद 153 अशी स्थिती झाली. मात्र करुण आणि सुंदर या दोघांनी भागीदारी करुन भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. या जोडीने या डावात केलेली भागीदारी सर्वोच्च ठरली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 105 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली. याशिवाय भारताकडून कोणत्याही जोडीला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही.
तसेच इंग्लंडकडून गसव्यतिरिक्त जोश टंग याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर ख्रिस वोक्स याने 1 विकेट घेतली. आता या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांकडून इंग्लंडसारखीच बॉलिंग अपेक्षित असणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज इंग्रजांना आघाडी मोडीत काढण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
