
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. टीम इंडियाला या सामन्यात एकूण 5 शतकं लगावल्यानतंरही पराभवाचं तोंड पहावं लागलं. इंग्लंडने भारतावर 5 विकेट्सने मात केली. इंग्लंडने यासह एकूण 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा एजबेस्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या दुसर्या सामन्यासाठी बुधवारी 25 जून रोजी लीड्सवरुन बर्मिंघमला रवाना झाली आहे. मात्र या दरम्यान युवा खेळाडू टीम इंडियासोबत प्रवासाला निघाला नाही. या खेळाडूला टीममधून मुक्त करण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला भारतीय संघातून मुक्त करण्यात आलं आहे. हर्षित टीमसह बर्मिंघमला गेला नाही. हर्षितचा कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. हर्षितची इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली होती. मात्र पहिल्या कसोटीआधी हर्षितचा संघात समावेश करण्यात आला होता. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, हर्षितचा पहिल्या कसोटीसाठीच समावेश करण्यात आला होता. हर्षितचा मागच्या दरवाज्याने प्रवेश झाल्याने त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र तसं झालं नाही. त्यानंतर आता हर्षितला मुक्त करण्यात आलं आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान हर्षितला इंडिया ए टीमकडून इंग्लंड लायन्स विरूद्धच्या पहिल्या अनऑफिशियल टेस्टसाठी संधी देण्यात आली होती. मात्र हर्षितला काही खास करता आलं नव्हतं. हर्षितने त्या सामन्यात 99 धावांच्या मोबदल्यात एकमेव विकेट मिळवली होती.
हर्षित राणा याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही हर्षित तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं, ही विशेष बाब म्हणता येईल. हर्षितने 22 नोव्हेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीतून सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्यानंतर हर्षितला 31 जानेवारी 2025 रोजी इंग्लंड विरुद्ध वनडे डेब्यूची संधी मिळाली. त्यानंतर हर्षितने इंग्लंड विरुद्धच 23 फेब्रुवारीला एकदिवसीय पदार्पण केलं.
हर्षितने टीम इंडियाचं 2 टेस्ट, 5 वनडे आणि 1 टी 20I मध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. हर्षितने कसोटीत 4, वनडेत 10 तर टी 20I मध्ये 3 अशा एकूण 17 विकेट्स घेतल्या आहेत.