Sanjay Raut: काँग्रेसने कितीही आपटली तरी…वेगळ्या विदर्भावरून संजय राऊतांची सणसणीत चपराक, आजारपणातून बाहेर येताच धडाडली तोफ
Sanjay Raut on Congress: आजारपणातून बाहेर पडताच खासदार संजय राऊत यांची तोफ धडाडली. वेगळ्या विदर्भावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली.

Sanjay Raut on Congress And Vidarbha: स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. भाजपने हा मुद्दा तापवला होता. भाजप वेगळ्या विदर्भासाठी आग्रही होती. पण मध्यंतरी हा विषय विस्मरणात गेला. त्यानंतर काल परवा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचे स्पष्ट केले. तर काँग्रेसमधील विदर्भातील काही नेत्यांनी पण हाचा सूर आळवला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधतानाच मित्र पक्ष काँग्रेसला ही सणसणीत चपराक लगावली.
भाजपवर साधला निशाणा
संजय राऊतांनी पहिला तोफगाळा भाजपवर टाकला. “या राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायेत अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर मिंधे गटाचा एकही आमदार त्याविरोधात उभा ठाकला नाही. म्हणजे हे अमित शाहांचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधील एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत आहे. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसून आहात,लोळागोळा होऊन. याचा अर्थ अमित शाह यांचा मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याला तुमचा छुपा पाठिंबा आहे.” अशा जबरी टोला त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे गटाला लगावला.
पालघरमध्ये गुजरातची घुसखोरी
पालघर जिल्ह्यात गुजरातने मोठी घुसखोरी केल्याचा आरोपही राऊतांनी यावेळी केला. पालघरमधील सर्व ठेकेदार गुजराती आहेत. ते अजून पुढे येतील. कधीकाळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी गुजरातने पालघरवर म्हणजे डांगवर दावा सांगितला होता, याची आठवण त्यांनी करुन दिली. डांग, उबरगाव, डहाणू आणि पालघर हे त्यांच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळे च त्यांनी बुलेट ट्रेन पालघरमधून नेली. महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. महाराष्ट्र म्हणजे फडणवीस सरकारला नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
काँग्रेसवर जहरी टीका
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेची री ओढली. यावर प्रसार माध्यमांनी लक्ष वेधले असता, राऊतांनी खणखणीत प्रतिक्रिया दिली. आम्ही वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा या मुद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. तर महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. हे त्यांचं राजकारण आहे. आणि भाजपनं कितीही प्रयत्न केला तरीही मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहात असेल तर त्याचं स्वप्न भंग होईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
