
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यजमान टीम इंडियानेही सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना या फेरीची आणखी प्रतिक्षा आहे. या फेरीतील पहिल्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनसेामने असणार आहे. लॉरा वॉल्वार्ट ही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. उपांत्य फेरीतील या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बुधवारी 29 ऑक्टोबरला होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे यंदा गेल्या अनेक दशकांची प्रतिक्षा संपवण्याची सुवर्णसंधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने गेल्या 2 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत इंग्लंडकडे सेमी फायनलमध्ये खेळण्याचा अधिक अनुभव आहे.
तसेच इंग्लंडने या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यामुळे एकूणच पाहता सर्वच बाबतीत इंग्लंडचा दबदबा पाहायला मिळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान आहे. आता दक्षिण आफ्रिका हे आव्हान पेलत फायनलचं तिकीट मिळवणार की इंग्लंड पुन्हा आणि सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचणार? यासाठी चाहत्यांना सामन्याच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.