ENG vs WI : इंग्लंडचा विजयी ‘पंच’, विंडीजवर 4 विकेट्सने मात करत टी 20I मालिकाही जिंकली

England vs West Indies 2nd T20I Match Result : इंग्लंडने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात विंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेनंतर आता टी 20I मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडने अशाप्रकारे सलग पाचवा विजय मिळवलाय.

ENG vs WI : इंग्लंडचा विजयी पंच, विंडीजवर 4 विकेट्सने मात करत टी 20I मालिकाही जिंकली
England vs West Indies 2nd T20i Match Result
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 08, 2025 | 11:09 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने वेस्ट इंडीज विरुद्ध सलग पाचवा विजय मिळवत वनडेनंतर टी 20I मालिकाही जिंकली आहे. इंग्लंडने विंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. तर त्यानंतर आता सलग दुसरा विजय मिळवत टी 20I मालिकाही जिंकली आहे. उभयसंघातील दुसरा टी 20I सामना काउंटी ग्राउंड ब्रिस्टोल येथे आयोजित करण्यात आला होता. विंडीजने इंग्लंडसमोर 197 धावांचं आव्हान ठेवलं होत. इंग्लंडने हे आव्हान 9 बॉलआधी पूर्ण केलं. इंग्लंडने 18.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडच्या विजयात सर्वांनी योगदान दिलं. मात्र विकेटकीपर फलंदाज जोस बटलर याने प्रमुख भूमिका बजावली. जोसने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 47 रन्स केल्या. कर्णधार हॅरी ब्रूक याने 34 धावांची खेळी केली. ब्रूकने या खेळीत 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. बेन डकेट आणि टॉम बँटन या दोघांनी प्रत्येकी 30-30 धावांचं योगदान दिलं. तर जेकब बेथल याने 26 रन्स जोडल्या. तर इतरांनी योगदान दिलं. इंग्लंडने अशाप्रकारे हे आव्हान सहज पूर्ण केलं. विंडीजकडून अल्झारी जोसेफ याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर अकील हौसेन, जेसन होल्डर, रोमरियो शेफर्ड आणि रोस्टन चेस या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकला. कर्णधार हॅरी ब्रूक याने विंडीजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 196 रन्स केल्या. विंडीजसाठी 5 जणांनी चांगली बॅटिंग केली. मात्र विंडीजला 200 पार पोहचता आलं नाही. विंडीजसाठी कर्णधार शाई होप याने 38 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 49 रन्स केल्या. जे चार्ल्स याने 47 धावांचं योगदान दिलं. रोवमॅन पॉवेल याने 34 रन्स केल्या. रोमरियो शेफर्ड याने 19 रन्स धावा जोडल्या. तर अखेरच्या क्षणी जेसन होल्डर आणि रोस्टन चेस या दोघांनी फटकेबाजी केली. त्यामुळे विंडीजला 190 पार पोहचता आलं.

इंग्लंडचा सलग पाचवा विजय

होल्डरने 9 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरसह 29 धावांची वादळी खेळी केली. तर चेसने 1 बॉलमध्ये खणखणीत सिक्स ठोकला आणि 6 धावा जोडल्या. ही जोडी नाबाद परतली. इंग्लंडसाठी लुक वूड याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर ब्रायडन कार्स, जेकब बेथल आणि आदिल रशीद या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.