Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर बेछूट गोळीबार, माजी कर्णधार असा बचावला, पोस्ट करत सांगितला सुटकेचा थरार

Australia Bondi Beach shooting Michael Vaughan : ऑस्ट्रेलियातील सिडनी जवळील बॉन्डी बिचवर झालेल्या बेछूट गोळीबारात 10 पेक्षा अधिक निष्पापांचा जीव गेला. यातून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन थोडक्यात बचावला. वॉनने स्वत:चा बचाव कसा केला? जाणून घ्या.

Sydney Shooting : ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर बेछूट गोळीबार,  माजी कर्णधार असा बचावला, पोस्ट करत सांगितला सुटकेचा थरार
Australia Bondi Beach Firing
Image Credit source: Getty
| Updated on: Dec 14, 2025 | 5:53 PM

ऑस्ट्रेलियातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या सिडनीतील बॉन्डी बीचवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या मृतांमध्ये पोलिसांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर गोळीबारातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गोळीबारातून इंग्लंडचा माजी आणि अनुभवी कर्णधार मायकल वॉन हा थोडक्यात बचावला आहे. स्वत: मायकल वॉन याने एक्स पोस्ट करत हा थरार सांगितला आहे.

नक्की काय झालं?

सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यूंचा उत्सव सुरु होता. मोठ्या प्रमाणात ज्यू जमले होते. मात्र अचानक गोळीबार सुरु झाला. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे जो तो आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागला. या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. तसेच नावेद अकरम असं हल्लेखोराचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे.

हा गोळीबार झाला तेव्हा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा बॉन्डी बीच परिसरातच होता. तसेच वॉनने या गोळीबारातून स्वत:चा कसा बचाव केला? हे देखील सांगितलं आहे. वॉनने रेस्टॉरंटमध्ये लपून स्वत:चा जीव वाचवला. वॉन आता सुरक्षित आहे.

मायकल वॉन याची एक्स पोस्ट

बॉन्डीमधील एका रेस्टॉरंटमध्ये लपून राहणं हा भयानक अनुभव होता. मी आता सुरक्षित आहे. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांचे आणि दहशतवाद्याचा सामना करणाऱ्यांचे आभार”, असं मायकल वॉनने एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

मायकल वॉनची क्रिकेट कारकीर्द

मायकल वॉनने इंग्लंडचं 86 एकदिवसीय 2 टी 20i आणि 82 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच वॉनला नेतृत्वाचाही तगडा अनुभव आहे. वॉनने इंग्लंडचं दीर्घकाळ नेतृत्व केलं होतं. वॉनने इंग्लंडचं 51 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. वॉनने त्यापैकी 26 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजयी केलंय. तर 11 सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. तर वॉनने त्याच्या नेतृत्वात 14 सामने अनिर्णित राखले होते.