
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंड संघाचा स्पार्क पूर्णपणे गेल्याचं दिसून आलं. चॅम्पियन्स म्हणून इंग्लंड संघाकडे पाहिलं जात होतं. पण सर्व काही धुळीस मिळालं असंच म्हणावं लागेल. भारताविरूद्धच्या वनडे मालिकेत व्हाईट वॉश मिळाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत वचपा काढू अशी विधानं इंग्लंड संघाकडून येत होती. पण त्यांचं आव्हान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतच संपुष्टात आलं. पहिल्या सामन्यात सामन्यात 300 पार धावा करूनही ऑस्ट्रेलियाला रोखता आलं नाही. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेलं 325 धावांचं आव्हान गाठताना डाव 317 धावांवरच आटोपला. त्यामुळे स्पर्धेतील शेवटचा सामना हा औपचारिक होता. हा सामना जिंकून शेवट गोड केला जाईल असं वाटत होतं. पण दक्षिण अफ्रिकेने सर्वप्रथम इंग्लंडला 179 धावांवर रोखलं. तसेच हे आव्हान 29.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे जोस बटलरच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीला डाग लागला. त्यामुळे त्याने सामन्यानंतर बरंच काही सांगितलं.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने सांगितलं की, ‘ही खरोखरच निराशाजनक कामगिरी होती, आज आम्ही आमच्या कामगिरीपेक्षा कमी पडलो होतो, खूप निराशाजनक वाटत आहे. चांगली खेळपट्टी होती, थोडीशी संथ होती. डकेटने आम्हाला चांगल्या स्थितीत आणले पण आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. खरे सांगायचे तर, संपूर्ण संघ म्हणून आम्हाला हवा तसा निकाल मिळत नाहीत आणि त्यामुळे आमचा आत्मविश्वास कमी झाला की काय हे मला माहित नाही.’
‘संघात बदल अपेक्षित आहेत. क्रिकेट आम्हाला कुठे घेऊन जाते ते आपल्याला पाहावे लागेल. अर्थात, यात काही शंका नाही, प्रतिभा आहे, आमच्याकडे एक उत्तम संघ तयार करण्यासाठी सर्व घटक आहेत, मला खात्री आहे की ब्रेंडन आणि आघाडीचे खेळाडू काही योजना तयार करतील आणि वैयक्तिकरित्याही त्यांची छाप पाडण्याची आणि संघ जिथे पोहोचू इच्छितो तिथे पोहोचेल याची खात्री करण्याची जबाबदारी आहे.’, असंही जोस बटलर पुढे म्हणाला.
‘विश्वचषक विजेता कर्णधार होण्याचा हा एक उत्तम काळ होता आणि माझ्या कर्णधारपदाच्या कार्यकाळातील तो माझा सर्वोत्तम दिवस होता. जो रुट आमच्यासाठी एक तेजस्वी प्रकाश आणि एक उत्तम उदाहरण आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर तो उत्कृष्ट खेळला आहे आणि आशा आहे की, मी त्याच्या पावलावर पाऊल ठेवू शकेन.’, असंही जोस बटलरने पुढे सांगितलं.