Alex Carey Controversy: एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची फसवणूक? एलेक्स कॅरी बाद की नाबाद!

Australia vs England, 3rd Test: एशेज कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 8 गडी गमवून 326 धावा केल्या. यात एलेक्स कॅरीची खेळी सर्वात महत्त्वाची ठरली. पण त्याला मिळालेल्या जीवदानामुळे वादाची ठिणगी पडली आहे.

Alex Carey Controversy: एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची फसवणूक? एलेक्स कॅरी बाद की नाबाद!
एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडची फसवणूक? एलेक्स कॅरी बाद की नाबाद!
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Dec 17, 2025 | 6:24 PM

Ashes DRS Controversy: एशेज कसोटी मालिका म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व.. या मालिकेतील प्रत्येक सामन्यात आक्रमकपणा आणि जिंकण्याची भूक दिसून येते. काहीही करून प्रतिस्पर्धी संघाला मात देण्याची धडपड असते. असं असताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात इंग्लंडची कसोटी लागली आहे. हा सामना गमावला तर मालिका पराभवाचं सावट आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून 326 धावा केल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं आहे. या धावसंख्येत एलेक्स कॅरीचं योगदान मोठं आहे. कारण त्याच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने इथपर्यंत मजल मारली. खरं तर त्याचा खेळ 72 धावांवरच आटोपला असता असं इंग्लंडच्या संघाचं म्हणणं आहे. यासाठी इंग्लंडचा संघ सामनाधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहे.

डावखुरा एलेक्स कॅरी 72 धावांवर असताना जोश टंगच्या गोलंदाजीवर झेल घेतल्याचा जोरदार अपील करण्यात आला. इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथ आणि गोलंदाज टंग यांना कॅरी बाद असल्याचा आत्मविश्वास होता. पण मैदानी पंची त्याला नाबाद दिलं. त्यामुळे इंग्लंडने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. पण स्निको तंत्रज्ञानाच्या आधारावर त्याला नाबाद घोषित केलं गेलं. कॅरीच्या बॅटजवळ जाण्यापूर्वीच स्निकोमीटरमध्ये नोंद दाखवली गेली. पण चेंडू जेव्हा जवळ गेला तेव्हा तसंच काहीच घडल्याचं दिसत नव्हतं. त्यामुळे तिसर्‍या पंचांनी नाबाद दिलं.

एलेक्स कॅरीची विकेट न मिळाल्याने इंग्लंडचा संघ नाराज दिसला. इतकंच काय तर कॅरीने देखील कबूल केलं की. कसला तरी आवाज आला होता आणि त्याला नशिबाची साथ मिळाली. दुसरीकडे, मालिकेत स्निकोमीटर चालवणाऱ्या कंपनीने देखील काहीतरी गोंधळ असल्याची कबुली दिली. बीबीजी स्पोर्ट्सने कबूल केले की कॅरीच्या बाबतीत स्निकोची चूक ऑपरेटरच्या चुकीमुळे झाली होती.ऑपरेटरने स्निकोच्या तंत्रज्ञानाचा वापर करून चुकीचा स्टंप माइक ऑडिओ उचलला. पण तांत्रिक चुकीचा फटका मात्र इंग्लंडला बसला. एलेक्स कॅरीने आणखी 34 धावा ठोकल्या आणि शतकही साजरं केलं. कॅरी लवकर बाद झाला असता तर 300 धावांचा पल्लाही गाठता आला नसता.