INDW vs ENGW : वूमन्स टीम इंडियाला टी 20i मालिकेत इतके विक्रम करण्याची संधी, दीप्ती शर्मा वर्ल्ड रेकॉर्ड करणार?
India Women vs England Women 2025 T20i Series : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकूण 5 टी 20I सामने खेळणार आहे. या मालिकेत दोन्ही संघांना अनेक विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. जाणून घ्या.

भारतीय महिला क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड वूमन्स टीम यांच्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 28 जूनपासून सुरुवात होत आहे. टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाणार आहे. या मैदानात टी 20i सामना खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रंट हीच्याकडे यजमान इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांचा या सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या एकाच संघाचा विजय होणार. त्यामुळे दोन्ही संघात विजयासाठी जोरदार चुरस पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे.
वूमन्स टीम इंडियाने डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात शेवटची टी-20 मालिका खेळली होती. महिला ब्रिगेडने तिन्ही सामने जिंकले होते. तर इंग्लंडने गेल्या महिन्यात विंडीज विरुद्ध खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघात या टी 20i मालिकेत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच या 5 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला काही रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
वूमन्स इंडिया ऐतिहासिक द्विशतकासाठी सज्ज
वूमन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 28 जून रोजी पहिला टी 20i सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा हा टी 20i क्रिकेटमधील 200 वा सामना ठरणार आहे. वूमन्स इंडिया यासह 200 टी 20i सामने खेळणारी तिसरी टीम ठरेल. आतापर्यंत इंग्लंडने 216 तर ऑस्ट्रेलियाने 200 टी 20i सामने खेळले आहेत.
स्मृती मंधानाला 2 विक्रमांची संधी
उपकर्णधार स्मृती मंधाना टी 20i क्रिकेटमध्ये 150 सामन्यांचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज आहे. स्मृतीने आतापर्यंत 148 टी 20i सामने खेळले आहेत. स्मृती 2 सामने खेळताच 150 टी 20i मॅचेस खेळणारी दुसरी भारतीय तर एकूण सातवी महिला क्रिकेटपटू ठरेल. सर्वाधिक 178 टी 20i सामने खेळण्याचा विक्रम भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या नावावर आहे.
तसेच स्मृतीला टी 20i क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. स्मृतीला त्यासाठी स्मृतीला आणखी 239 धावांची गरज आहे. स्मृती असं करताच 4 हजार टी 20i धावा करणारी पहिली भारतीय तर एकूण दुसरी फलंदाज ठरेल.
दीप्ती शर्माला वर्ल्ड रेकॉर्डची संधी
दीप्ती शर्मा हीला या मालिकेत 2 विक्रम करण्याची संधी आहे. दीप्तीला टी 20i क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला हा बहुमान मिळण्यासाठी 12 विकेट्सची गरज आहे. तर दीप्ती वूमन्स टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्यापासून 14 विकेट्स दूर आहे. दीप्तीने आतापर्यंत 124 टी 20i सामन्यांमध्ये 138 विकेट्स घेतल्या आहेत.
हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौर हीने भारताला तिच्या नेतृत्वात 123 पैकी 71 टी 20i सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पाचही सामने जिंकले, तर हरमनप्रीत मेग लॅनिंगच्या सर्वाधिक 76 टी 20i सामने जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करेल.
