ENG vs WI : इंग्लंडचा वनडेनंतर टी 20I मध्येही धमाका सुरुच, विंडीज विरुद्ध विजयी सलामी

England vs West Indies 1st T20I Match Result : वेस्ट इंडीजला इंग्लंड विरुद्ध सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. विंडीजची वनडे सीरिजनंतर टी 20i मालिकेतही पराभवाने सुरुवात झालीय.

ENG vs WI : इंग्लंडचा वनडेनंतर टी 20I मध्येही धमाका सुरुच, विंडीज विरुद्ध विजयी सलामी
jos buttler eng vs wi 1st t20i
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Jun 07, 2025 | 7:31 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजमध्येही विजयी घोडदौड सुरु ठेवत सलग चौथा सामना जिंकला आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर 7 जून रोजी इंग्लंडने टी 20i मालिकेतही विजयी सलामी दिली. इंग्लंडने रिव्हरसाईड ग्राउंड, चेस्टर ली स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यात विंडीजवर 21 धावांनी मात करत 3 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. उभयसंघातील दुसरा सामना हा रविवारी 8 जून रोजी होणार आहे.

सामन्यात काय झालं?

इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. जोस बटलर याच्या 96 धावांच्या जोरावर इंग्लंडने विंडीजसमो 189 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात विंडीजला 9 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 167 धावाच करता आल्या.

इंग्लंडसाठी जोस बटलर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बटलरला शतक करण्याची संधी होती. मात्र निर्णायक क्षणी तो आऊट झाला. बटलरने 59 बॉलमध्ये 162.71 च्या स्ट्राईक रेटने 96 रन्स केल्या. बटलरने या खेळीत 4 षटकार आण 6 चौकार लगावले. ओपनर जेमी स्मिथ याने 38 धावांचं योगदान दिलं. तसेच जेकब बेथल याने नाबाद 23 धावा जोडल्या. या तिघांव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे इंग्लंड 200 पर्यंतही पोहचू शकली नाही. इंग्लंडने 6 विकेट्स गमावून 188 रन्स केल्या. विंडीजच्या गोटात एकसेएक स्फोटक फलंदाज असल्याने ते जिंकतील, असं म्हटलं जात होतं. मात्र इंग्लंडने यशस्वीरित्या 188 धावांचा बचाव केला.

विंडीजची बॅटिंग

विंडीजला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 167 धावांपर्यंतच पोहचता आलं. विंडीजच्या तिघांचा अपवाद वगळता इतर सर्वांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र एकालाही विंडीजसाठी विजयी खेळी साकारचा आली नाही. विंडीजसाठी ओपनर एव्हीन लेव्हीस याने सर्वाधिक 39 धावा केल्या. रोस्टन चेज याने 24 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना 20 पारही जाता आलं नाही. इंग्लंडकडून लियाम डावसन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मॅथ्यू पॉट्स आणि जेकब बेथल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर आदिल रशीद याने 1 विकेट मिळवली.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जेमी स्मिथ, बेन डकेट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, जेकब बेथेल, विल जॅक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, आदिल रशीद आणि मॅथ्यू पॉट्स.

वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन : जॉन्सन चार्ल्स, एविन लुईस, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रुदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, गुडाकेश मोती आण अल्झारी जोसेफ.