
Security Breach in Cricket: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांची जोरदार खेळी खेळली. झारखंडची राजधानी रांची येथील मैदानावर त्याने जेव्हा शतक पूर्ण केले. तेव्हा एक चाहता मैदानात घुसला. त्याने विराट कोहलीच्या पायाला हात लावला. तो जणू पाया पडला. याप्रकाराने सर्वांनाच धक्का बसला. सुरक्षा रक्षकांनी या चाहत्याला ताब्यात घेतले. त्याला त्यांनी मैदानाबाहेर नेले. पोलिसांनी या फॅनला ताब्यात घेतले. क्रिकेट सामन्यात सुरक्षेचा भंग केल्यावर काय शिक्षा होते हे तुम्हाला माहिती आहे का?
विराट कोहली सोबत यापूर्वी सुद्धा अशा गोष्टी अनेकदा घडल्या आहेत. त्याचे चाहते सुरक्षा कवच भेदून अनेकदा त्याच्याजवळ आले आहेत. त्यांचा विराटला कोणतेही नुकसान करण्याचा इरादा नक्कीच नाही. पण सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा गंभीर धोका संभवतो. मग अशावेळी क्रिकेट सामन्यात सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास काय शिक्षा होते हे तुम्हाला माहिती आहे का?
काय मिळते शिक्षा?
अशा प्रकरणात आयसीसी (ICC) आणि बीसीसीआय (BCCI) यांचे असे कुठलेही स्पष्ट नियम नाहीत. पण अशा प्रकरणात पोलीस कठोर कारवाई करतात. कारण हा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. तसेच सामन्यात अडथळा येतो तो भाव वेगळाच. आतापर्यंत पुरुषांनी असे प्रकार केलेले आढळतात. पण महिला फॅन्स पण असे प्रकार करायला लागल्यावर अवघड होईल. त्यादृष्टीने स्पष्ट नियम करण्याची मागणी होत आहे.
मोठा दंड: अनेकदा सुरक्षा पथक, अशा चाहत्यांना समज देऊन सोडून देते. पण पोलिसांनी मनावर घेतले तर कठोर कारवाई होऊ शकते. टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात एका भारतीय चाहत्यावर अशा प्रकारात 6.5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
थेट तुरुंगावास: सुरक्षा पथक सुरक्षेचा भंग करणाऱ्याला थेट पोलिसांच्या हवाली करते. पोलीस अशा चाहत्याला ताब्यात घेते. कधी कधी त्याला दोन-तीन दिवसांचा तुरुंगवास ही होतो. रांचीतील चाहत्यासोबत असेच घडले.
कोहलीचा पाय पडणारा चाहता सध्या कुठे?
रांची येथील सामन्या दरम्यान मैदानात घुसलेल्या चाहत्याचे नाव सौविक आहे. मैदानात घुसल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या वडिलांनी सांगितले की पैसे वाचवत त्याने या सामन्यासाठी तिकीट खरेदी केले होते. यापूर्वी आयपीएल सामना पाहण्यासाठी तो चेन्नईला सायकलने प्रवास करत पोहचला होता. अजून त्याला पोलिसांनी सोडल्याचे वृत्त समोर आलेले नाही.