
चॅम्पियन्स ट्रॉफीत अखेर नको ते घडलं. ऑस्ट्रेलियाला यावेळेसही नशिबाने दगा दिला असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आयसीसी स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांना पूरक ठरतात. पण यात ऑस्ट्रेलियाचं पारडं कायमच जड असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या दोन्ही संघांतील द्वंद्व क्रीडाप्रेमींसाठी वेगळीच पर्वणी असते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीचं गणित सोडवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना महत्त्वाचा होता. पण यावेळीही ऑस्ट्रेलियाला पावसाचा फटका बसला असंच म्हणावं लागेल. त्यामुळे थेट उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न आता जर तरवर येऊन ठेपलं आहे. सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. ऑस्ट्रेलियाला आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकावाच लागले. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. मागच्या दोन पर्वात ऑस्ट्रेलियाला पावसाचा असाच फटका बसला होता.
16 वर्षांनंतर जेतेपद जिंकण्याच्या आत्मविश्वासाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रवेश करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे 2009 नंतर ऑस्ट्रेलियन संघ अफगाणिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून पुन्हा उपांत्य फेरीत पोहोचेल का हे पाहणे बाकी आहे.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झांपा.