
टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचे खेळाडू या ऐतिहासिक विजयानंतर आपल्या घरी रवाना झाले आहेत. वर्ल्ड कप विजयाचा आनंद अजून सुरुच आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाची 28 वर्षांची वर्ल्ड कप ट्रॉफीची दीर्घ प्रतिक्षा संपवणाऱ्या दिग्गजाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. गेरी कर्स्टन यांची 2014 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
कर्स्टन यांना कोचिंगचा तगडा आणि प्रदीर्घ असा अनुभव आहे. कर्स्टन यांनी भारताला 2011 साली त्यांच्या कोचिंगमध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तसेच कर्स्टन यांनी पाकिस्तानचीही हेड कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच कर्स्टन नुकतंच आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत नामिबिया टीमसाठी सल्लागार म्हणून योगदान दिलं.
त्यानंतर आता कर्स्टन यांची श्रीलंकेच्या हेड कोचपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. कर्स्टन यांचा कोचिंगचा कालावधी हा 2 वर्षांचा असणार आहे. ते 15 एप्रिलपासून पदभार स्वीकारणार आहेत.
कर्स्टन यांची सनथ जयसूर्या यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. सहयजमान असलेल्या श्रीलंकेचं आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतून आव्हान संपुष्टात आल्याने जयसूर्या यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
श्रीलंकेचं आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतूनच आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानने श्रीलंकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात 5 धावांना मात केली होती. यासह श्रीलंकेचं स्पर्धेतून पॅकअप झालं. जयसूर्याने या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
जयसूर्याने जुलै 2024 मध्ये अंतरिम हेड कोच म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर क्रिकेट बोर्डाने दिग्गज माजी फलंदाजांची ऑक्टोबर महिन्यात मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. जयसूर्याच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी हा जूनपर्यंत होता. मात्र जयसूर्याने त्याआधीच राजीनामा देऊन बाजूला व्हायचं ठरवलं. विशेष म्हणजे जयसूर्याने राजीनामा देणार याबाबत क्रिकेट बोर्डाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे क्रिकेट बोर्ड राजीनामा स्वीकारणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र कर्स्टन यांच्या नावाची घोषणा करताच जयसूर्याचा राजीनामा स्वीकार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, “इंग्लंड विरूद्धच्या मालिकेदरम्यान 2 महिन्यांआधीच मी या पदावर फार वेळ राहिन याची मला आशा नसल्याचं म्हटलं होतं. मी तेव्हाच हा निर्णय केला होता. त्यामुळे टी 20i वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट अविस्मरणीय करण्याचा माझा प्रयत्न होता. मात्र मी तसं करण्यात अपयशी ठरलो”, असं म्हणत जयसूर्याने खंत व्यक्त केली होती.