गौतम गंभीरच्या साथीदारने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा दिला मंत्र, कसं काय ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धा संपल्यानंतर आता भारतीय संघ क्रिकेटच्या पुढच्या प्रवासाला निघाला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय युवा संघ इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची उणीव असल्याने ही मालिका खूपच जड जाणार असंच दिसतंय.

गौतम गंभीरच्या साथीदारने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा दिला मंत्र, कसं काय ते जाणून घ्या
गौतम गंभीरच्या साथीदारने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा दिला मंत्र
Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Jun 07, 2025 | 5:09 PM

भारतीय संघ 2027 वर्ल्ड चॅम्पियनशिप प्रवासाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने करणार आहे. त्यामुळे ही कसोटी मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ 2007 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये शेवटची मालिका जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही मालिका जिंकता आलेली नाही. त्यात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतल्याने उणीव भासेल. शुबमन गिलच्या नेतृत्वात युवा खेळाडूंचा कस लागणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरला आपला अनुभव पणाला लावावा लागणार आहे. असं असताना गौतम गंभीरचा जुना सहकारी आणि माजी गोलंदाज प्रशिक्षकाने इंग्लंड मालिकेसाठी काही टिप्स दिल्या आहेत. प्लेइंग इलेव्हनमधील काही बदल सूचवले आहेत. यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना त्रासदायक ठरेल. 20 जूनपासून भारत इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

कुलदीप यादव ठरेल घातक

एका मुलाखतीत टीम इंडियाचा माजी गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूणने सांगितलं की, कसोटी सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पाच गोलंदाजांचा समावेश करावा. इंग्लंडविरुद्ध पाच गोलंदाज खेळवणं खूपच फायदेशीर ठरेल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजची जोडी इंग्लंडच्या भूमीवर घातक ठरू शकते. पण कुलदीप यादव ट्रम्प कार्ड असण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात कुलदीप यादवला खेळपट्टी फार काही मदत मिळाली नाही तर दुसऱ्या डावात अधिक घातक ठरू शकतो. कारण कुलदीप यादवला खेळपट्टीवर थोडं तरी वळण मिळालं तर चांगली गोलंदाजी करू शकतो. कुलदीप यादवने 13 कसोटी सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत.

अर्शदीप सिंगलाही संधी द्या

भरत अरूण यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज व्यतिरिक्त अर्शदीप सिंगलाही संघात स्थान मिळालं पाहीजे. तिसऱ्या गोलंदाजासाठी प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केलं पाहीजे. डावखुरा गोलंदाज असल्याने इंग्लंडमध्ये प्रभावी ठरू शकतो. अर्शदीप सिंगमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडच्या फलंदाजांना त्याचा सामना करण्यास कठीण जाऊ शकतं. अर्शदीप सिंगने अद्याप कसोटी सामना खेळला नाही. पण इंग्लंडविरुद्ध पदार्पण करून नावलौकीक मिळवू शकतो. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अर्शदीपने चांगली कामगिरी केली आहे.