गुजरात टायटन्सला मोठा धक्का, आरसीबीला पराभूत केल्यानंतर स्टार खेळाडू मायदेशी परतला; कारण…

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सची कामगिरी चांगली राहिली आहे. पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर गुजरातने कमबॅक केलं. मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला पराभूत करून विजयी घोडदौड सुरु केली आहे. मात्र असं असताना स्टार खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतला आहे.

गुजरात टायटन्सला मोठा धक्का, आरसीबीला पराभूत केल्यानंतर स्टार खेळाडू मायदेशी परतला; कारण...
Image Credit source: Gujrat Titans Twitter
| Updated on: Apr 03, 2025 | 6:53 PM

आयपीएल 2025 स्पर्धेची रंगत आता प्रत्येक सामन्यानंतर अजून वाढत आहे. 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 8 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील सलग दुसरा विजय शुबमन गिलच्या नेतृत्वात मिळाला. असं असताना गुजरात टायटन्सला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार गोलंदाज कगिसो रबाडा मायदेशी परतला आहे. वैयक्तिक कारणामुळे रबाडाने घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पर्वात रबाडा आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली होती. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला नव्हता. तेव्हा कर्णधार शुबमन गिलने सांगितलं होतं की, वैयक्तिक कारणामुळे या सामन्यात खेळत नाही. गुजरात टायटन्सने सांगितलं की, ‘कगिसो रबाडा घरातील काही समस्या सोडवण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत परतला आहे.’

वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा परत कधी येईल याबाबत काही अपडेट मिळाले नाहीत. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मागच्या पर्वात पंजाब किंग्सचा भाग होता. पण गुजरात टायटन्सने 10.75 कोटी खर्च करून त्याला संघात घेतलं आहे. रबाडा 2022 ते 2024 या कालावधीत पंजाब किंग्ससाठी खेळला आहे. यापूर्वी 2017 ते 2022 या कालावधी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रबाडाने एकूण 82 सामन्यात 119 विकेट घेतल्या आहेत.

गुजरात टायटन्स आपला चौथा सामना 6 एप्रिलला खेळणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध असणार आहे. गुजरात टायटन्सने 2022 साली जेतेपदावर नाव कोरलं होतं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. तर 2023 मध्ये दुसऱ्या अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला होता. 2024 या पर्वात ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघात घेतलं. त्यानंतर कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर पडली. मात्र मागच्या पर्वात गुजरातची कामगिरी निराशाजनक राहिली होती.