ENG vs IND : टीम इंडियात या खेळाडूची निवड झालेली नसतानाही अचानक एन्ट्री, कोण आहे तो?

Team India England Tour 2025 : भारतीय संघाच्या मनात लीड्स कसोटीतील पराभवाची सल आहे. अशात टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीआधी सरावाला सुरुवात केली आहे. या सराव सत्रात इंग्लंड दौऱ्यासाठी समावेश नसलेला खेळाडू सहभागी झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ENG vs IND : टीम इंडियात या खेळाडूची निवड झालेली नसतानाही अचानक एन्ट्री, कोण आहे तो?
Team India Net Practice
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 28, 2025 | 11:08 PM

लीड्स टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. शुबमन गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने पाहुण्या टीम इंडियावर 5 विकेट्सने मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा बर्मिंगहॅममधील एजबेस्टनमध्ये होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा विजय मिळवून 2-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा घेण्यासह मालिकेत बरोबरी करण्याचं आव्हान भारतासमोर असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया तयारीला लागली आहे. टीम इंडियाने विश्रांतीच्या काळात नेट्समध्ये सराव करण्यास प्राधान्य दिलं आहे.

टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू नेट्समध्ये घाम गाळत आहे. मात्र या सरावादरम्यान असा एक खेळाडू पाहायला मिळाला ज्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या खेळाडूची अचानक झाल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या खेळाडूच्या एन्ट्रीमुळे टीम मॅनेजमेंट दुसर्‍या कसोटीसाठी संघात बदल करणार की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार याने नेट्समध्ये टीम इंडियासोबत सराव केला. हरप्रीतचा टीम इंडियासोबतचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हरप्रीतची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. मात्र त्यानंतरही हरप्रीत सराव करताना दिसल्याने त्यालाही हर्षित राणाप्रमाणे मागच्या दाराने संधी मिळणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

एजबेस्टनमधील हरप्रीतचा हा व्हीडिओ कसोटी मालिकेचं वृत्तांकन करत असलेल्या संदीपन बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हीडिओत हरप्रीत ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याच्यासह बॉलिंग प्रॅक्टीस करत आहे. मात्र यात एकच फरक स्पष्टपणे पाहायला मिळाला. टीम इंडियाच्या इतर सर्व खेळाडूंनी सरावासाठी असलेली जर्सी परिधान केली होती. तर हरप्रीतकडे तशी जर्सी नव्हती. त्यामुळे हरप्रीत फक्त सरावासाठीच भारतीय संघासोबत जोडला गेला होता, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हरप्रीत ब्रारचा नेट्समध्ये सराव

सरावासाठी संधी मिळण्याचं कारण काय?

हरप्रीत आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी खेळतो. हरप्रीतची भारतीय संघात आतापर्यंत एकदाही निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी पोषक परिस्थितीत फिरकी गोलंदाजांकडून सराव करुन घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इंग्लंडच्या संघात एकही डावखुरा फिरकीपटू नाही. तर संघात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे डावखुरे स्पिनर आहेत. तसं असूनही हरप्रीत ब्रारला सराव करण्यासाठी संधी का दिली? या प्रश्नाचं उत्तर हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.