अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार, कसं ते गणित समजून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं गणित मनोरंजक वळणावर येऊन ठेपलं आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर ब गटातील उपांत्य फेरीचं गणित काही अजून सुटलेलं नसून काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. अफगाणिस्तान उपांत्य फेरी गाठू शकते कसं ते समजून घ्या

अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार, कसं ते गणित समजून घ्या
अफगाणिस्तान टीम
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 27, 2025 | 4:05 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला. लाहोरमध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने 50 षटकांत 325 धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ 317 धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानने 8 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहोचण्यासाठी ब गटातील तीन संघांमध्ये थेट स्पर्धा आहे. अफगाणिस्तानने पराभूत केल्याने इंग्लंड आता ब गटातून बाद झाला आहे. इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवून अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पुढील सामन्यात अफगाणिस्तान संघाचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होईल. जर अफगाण संघाने हा सामना जिंकला तर ते निश्चितच उपांत्य फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी होणारा अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ची लढाई असेल.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड 1 मार्च रोजी आमनेसामने येतील. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. जर अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला तर दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्यापूर्वी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 3 गुण आहेत.

उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या अफगाणिस्तानचे फक्त 2 गुण आहेत. त्यामुळे जर अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जर ते हरले तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ब गटातून भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या दोन्ही संघात 2 फेब्रुवारीला होणारा सामना औपचारिक असणार आहे. या सामन्यातील जय पराजयाने दोन्ही संघांना काही फरक पडणार आहे. पण ग्रुपमध्ये टॉपला राहण्यासाठी दोन्ही संघांची धडपड असेल.  कारण टॉपला असलेल्या संघाची ब गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढत होईल.

बातमी वाचा : धोनीच्या टीशर्टवरील मेसेजने खळबळ! चाहत्यांमध्ये रंगली जोरदार चर्चा